पनवेल - अकरावीच्या वर्गात शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याने शाळेतच स्वतःला पेटून घेत, आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. कळंबोलीतल्या सुधागड विद्यालयात ही घटना घडली. शिवम जाधव असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शिवमचे वडील दिपक जाधव मुंबई पोलीस दलात नागपाडा मोटर परिवहन विभागात चालकाची नोकरी करतात. कळंबोलीतील अमरदीप सोसायटीत ते राहतात. कळंबोलीतल्या सुधागड एज्युकेशन सोसायटी विद्यालयात अकरावीच्या वर्गात तो शिक्षण घेतो.
नेहमीप्रमाणे आज तो कॉलेजला जाण्यासाठी निघालेला असताना त्याने वडिलांकडे बाईकची मागणी केली. त्यावर वडिलांनी बाईकसाठी नकार दिल्याने त्याला राग आला. रागाच्या भरात त्याने सुधागड कॉलेज गाठले. महाविद्यालय सुरू झाल्यानंतर तो वर्गात गेला. त्यानंतर अचानक वर्गातून बाहेर पडून तो शौचालयात गेला. खूप वेळ तो शौचालयात होता. त्यानंतर अचानक पेटत्या कपड्यासहीत तो वर्गाच्या खोलीत धावत आला.
शुभमला पेटलेल्या अवस्थेत पाहून वर्गातील शिक्षकांनी त्यांच्या अंगावरील कपडे काढून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. यात तो जवळपास ९० टक्के भाजला गेला. सध्या त्याला उपचारासाठी ऐरोलीतील नॅशनल बर्न रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.