रायगड - 3 जूनला जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळ आले होते. यात नुकसान झालेल्या जिल्हा परिषद शाळेच्या दुरुस्तीसाठी चोवीस कोटीपैकी पहिल्या टप्यातील साडेसात कोटींचा निधी राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केला आहे.
जिल्हा प्रशासनाकडे वर्ग झालेला निधी हा जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे. राज्य शासनाने निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या नागरिकांच्या घरासाठी आणि बागायतीसाठी भरीव मदत केली आहे. तशीच मदत शाळेसाठी राज्य शासनाने केली आहे. उर्वरित निधीही लवकरच शासनाकडून जिल्हा प्रशासनाकडे वर्ग होईल, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
निसर्ग चक्रीवादळात जिल्हा परिषदेच्या 1552 शाळा, 1350 अंगणवाडी आणि 186 खासगी शाळांचे नुकसान झाले. जिल्हा परिषदेच्या दीड हजार शाळांचे 37 कोटी, अंगणवाडींचे 13 कोटी तर खाजगी शाळांचे 6 कोटी इतके नुकसान झाले आहे. याबाबत जिल्हा परिषदेने शाळांचा दुरुस्ती प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. त्यानुसार राज्य शासनाने 24 कोटी निधी हा निसर्गात कोलमडून पडलेल्या शाळांसाठी मंजूर केला आहे. यापैकी साडेसात कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्यात आला आहे.
हेही वाचा - 'आयटीबीपी'च्या जवानांची 'लियो पारगील' शिखरावर यशस्वी चढाई
निसर्ग चक्रीवादळाचा रायगडकरांना मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. यामध्ये लाखो घराची पडझड झाली. नारळ फोफळी, आंबा, काजू या बागांचे अतोनात नुकसान झाले. राज्य शासनाने तातडीने घराच्या पडझडी आणि बागयतीसाठी निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केला होता. निसर्गाने जिल्हा परिषद तसेच खाजगी शाळांचेही अतोनात नुकसान केले. त्यामुळे पडझड झालेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण कसे द्यायचे, हा एक प्रश्न उपस्थित झाला होता. जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगणवाडी आणि खाजगी शाळांचा दुरुस्तीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आलेला होता. त्यानुसार राज्य शासनाने पहिल्या टप्यात साडेसात कोटी निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केला आहे. हा निधी लवकरच जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून सुरू केली आहे.
राज्य शासनाकडे निसर्गात पडझड झालेल्या जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्तीसाठीच्या निधीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला होता. यासाठी 24 कोटींचा निधी राज्य शासनाने विशेष बाब म्हणून मंजूर केला असून त्यापैकी साडेसात कोटी निधी गेल्या आठवड्यात प्राप्त झाला आहे. हा निधी जिल्हा परिषदकडे वर्ग करण्यात येणार आहे. उर्वरित निधीही लवकरच मिळेल. तसेच दुसरीकडूनही निधी उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. असे पालकमंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - उद्या होणार अंतिम वर्षाच्या परीक्षांचा निर्णय; राज्यपालांच्या भेटीनंतर उदय सामंतांची माहिती