रायगड - मतदान जनजागृती कार्यक्रमांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय महाड येथील प्रांगणात भव्य मानवी साखळीतून जिल्ह्याची प्रतिकृती आणि निवडणूक आयोगाचे चिन्ह तयार केले गेले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान होण्याच्या दृष्टीने जनजागृती करण्याच्या उद्देशाने या मानवी साखळीचे अयोजन करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील सुमारे १५०० विद्यार्थ्यांनी मानवी साखळीच्या माध्यमातून रायगड जिल्ह्याची प्रतिकृती साकारली होती. सदर प्रतिकृतीमध्ये भारत निवडणूक आयोगाचे चिन्ह आणि मतदान केलेल्या मतदाराचे बोट प्रतिकात्मकरित्या साकारण्यात आले होते. संगीताच्या तालावर विद्यार्थ्यांनी सदर कलाकृती सादर केली.
जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या कल्पनेतून तर विठ्ठल इनामदार आणि सुनिल जाधव यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मतदार जनजागृती विषयक घोषणांनी परिसर दणाणून गेला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य धनाजी गुरव आणि प्राध्यापक सोनार तसेच इतर सर्व स्टाफने विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमासाठी १९४ महाड विधानसभा मतदार संघातील तहसीलदार चंद्रसेन पवार यांच्यासह अनेक सहकारी आणि कर्मचारी उपस्थितीत होते.