रायगड - खालापूर तालुक्यातील इसांबेवाडी या ठिकाणी डोंगर उत्खनन सुरू आहे. यामुळे भूस्खलन होऊन घरांना नुकसान आणि जीवितहानी होण्याची शक्यता आहे. या ठिकाणावरील काही घरांचे स्थलांतर झाले आहे, मात्र काही घरे अद्याप त्याच ठिकाणी आहेत.
हेही वाचा - ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून दुकानदारांना गंडा घालणाऱ्या टोळीला खोपोलीत अटक
इसांबेवाडीत सध्या चार घरांचे कुटुंब वास्तव्य करत आहे. मात्र, वाडीतील बाकीच्या घरांचे स्थलांतर करण्यात आले असून त्यांना योग्य मोबदला मिळाला असल्यामुळे ते स्थलांतरीत झाले, असे वाडीत वास्तव्य करीत असलेले कृष्णा पांडू पवार यांनी सांगितले. मात्र, कोणत्या अटीशर्थींच्या आधारावर या आदिवासी बांधवाना स्थलांतरित करण्यात आले, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. येथे एमआयडीसी येणार असल्याच्यी शक्यता आहे, त्यावरून घरे खरेदी केली गेली, अशीही चर्चा आहे.
भरावासाठी डोंगर पोखरले
इसांबे वाडी या ठिकाणी डोंगर पोखरून टाकल्यामुळे भविष्यात भूस्खलन होवून माती जवळपासच्या गावात शिरू शकते किंवा शेती व्यवसायाला धोका निर्माण होवू शकतो. परंतु, याकडे महसूल खात्यांनी अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे दिसते. तसेच याबाबीला कोणीही गांभीर्याने घेत नाही.
योग्य मोबदला मिळण्याच्या प्रतिक्षेत
इसांबे वाडीत 70 घरे होती, मात्र अनेकांना योग्य मोबदला देवून त्यांना स्थलांतरीत करण्यात आले असून रुचीसोया जवळ जागा देण्यात आली. परंतु, आम्हाला तुटपुंजी रक्कम देत असल्यामुळे आम्ही ती नाकारली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू झाल्यामुळे दगडी माती येते. त्यामुळे, रोज भितीच्या छायेखाली आम्ही राहत आहोत. मात्र, घराचा योग्य मोबदला आणि जागा मिळाल्यास आम्ही स्थलांतर करू, असे काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
वेळीच उपाययोजना करणे गरजेचे
इसांबे वाडी या डोंगराळ भागात मोठ्या प्रमावर उत्खनन सुरू आहे. त्याचबरोबर, येथे बंगले बनविण्यासाठी उत्खनन झाले असून या ठिकाणी संपूर्ण डोंगर पोखरण्याचे काम सुरू असल्यामुळे भविष्यात या ठिकाणी भूस्खलन होवून परिसरातील गावांना धोका निर्माण होवू शकतो. म्हणून आजही आपल्याजवळ वेळ आहे. अनर्थ झाल्यावर सांत्वन करण्यापेक्षा आताच उपयायोजना महत्वाच्या आहेत, असे मत माजगावचे माजी सदस्य जयवंत पाटील यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - महाडकरांनी तातडीने आरोग्य तपासणी करून घ्यावी - मंत्री आदित्य ठाकरे