रायगड - शासकीय रुग्णालयाच्या कारभारावर नजर ठेवण्यासाठी राज्य शासनाने सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्राच सीसीटीव्ही यंत्रणा लावण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १४ रुग्णालयात ६५ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी १४ लाख ६० हजार रुपये खर्चाची मान्यता राज्य सरकारने दिली आहे.
रुग्णांना शासकीय रुग्णालयात आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन करोडोंचा खर्च करते. त्याचबरोबर रुग्णालयात पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी शासन निधी देत आहे. जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग, मुख्य प्रवेशद्वार, शस्त्रक्रियागृह परिसर, अपघात वैद्यकीय अधिकारी कक्ष तसेच आवश्यक ठिकाणी कॅमेरे बसविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार असल्याने रुग्णालयातील प्रत्येक घडामोडीवर आता नजर राहणार आहे.
रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार असल्याने येथील कारभार तसेच घडणाऱ्या घटना कॅमेऱ्यामध्ये कैद होणार आहेत. शासकीय रुग्णालयात रुग्ण तपासणी बाबत काही विपरीत घटना घडली की अनेकवेळा रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांना मारहाणीचे तसेच गोंधळ घालण्याचे प्रकार घडतात. मात्र, सध्या सीसीटीव्ही कॅमेरे रुगणालायत नसल्याने अशा घटना झाल्यातरी याबाबत पुरावे मिळत नाहीत. त्यामुळे आता सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याने अशा अनुचित घटना तसेच रुग्णालयातील इतर अनुचित प्रकारांना आळा बसणार आहे.
अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात २१, माणगाव उपजिल्हा रुग्णालयात १७, पेण ४, रोहा ६, श्रीवर्धन ८ तर उरण, पनवेल, महाड, कशेळे, जसवली, पोलादपूर, मुरुड, चौक, म्हसळा याठिकाणी प्रत्येकी १ सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात येणार आहे