रायगड - उरण तालुक्यातील माणकेश्वर समुद्रकिनारी बॉम्ब सदृश्य नळकांड्या सापडल्याने परिसरामध्ये खळबळ माजली होती. तपासणीनंतर या कांड्या मोठ्या जहाजांवर सिग्नल देण्यासाठी वापरण्यात येणारे फ्लायर असल्याचे निष्पन्न झाले आहे.
अशाप्रकारच्या वस्तू सापडल्यास पोलिसांना काळावण्याचे आवाहन - उरणच्या माणकेश्वर समुद्र किनारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास किनाऱ्यावर खेळणाऱ्या मुलांना काही नाळकांड्या सापडल्या. या नळकांड्यांसोबत मुले खेळत असताना एक नळकांडी फुटली. त्यानंतर परिसरात बॉम्ब सदृश्य नळकांड्या सापडल्याची माहिती उरण, मोरा पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता माणकेश्वर समुद्र किनारी अनेक नळकांड्या पडून असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी नळकांड्यांची तापासणी करून या बॉम्ब सदृश्य नळकांड्या या मोठ्या जहाजावरील सिग्नल फ्लायर असल्याचे स्पष्ट केले. यामुळे येथील परिसरामधील तणाव निवळला आहे. मात्र, या सर्व प्रकाराबाबत पोलीस यंत्रणेला विचारणा केली असता निकामी झालेल्या या कांड्या मोठ्या प्रमाणात किनाऱ्यावर भरतीच्या पाण्यासोबत आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, आशाप्रकारच्या कांड्या किंवा त्यासदृश्य वस्तू किनारी भागात सापडल्यास पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अपघात होण्याची दाट शक्यता - पिरवाडी ते माणकेश्वर हा मोठा समुद्रकिनारा असून, हा किनारा थेट आरबी समुद्राशी जोडलेला आहे. यामुळे मोठ्या जहाजांमधून फेकण्यात येणाऱ्या वस्तू थेट येथील समुद्र किनारी येतात. काहीवेळा महत्त्वाच्या आणि किंमती वस्तू या किनाऱ्यावर येत असल्याने येथील रहिवासीही अशा वस्तू किनाऱ्यावर आढळल्या की उचलण्यासाठी पुढे असतात. यातून अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण होते.
हेही वाचा - Mumbai Pune Highway Accident : मुंबई-पुणे महामार्गावर टँकर उलटल्याने भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू