खालापूर (रायगड) - खोपोली शिळफाटा या रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड कंटेनर तसेच ट्रकची वाहतूक होत आहे. या वाहतुकीमुळे येथे अनेक वेळा अपघात झाल्याने खोपोली शिळफाटा येथे मोठ्या प्रमाणावर नागरिकांना आपले प्राण गमवावे लागल्याने ही ओव्हरलोड वाहतूक अनेकांना डोकेदुखी ठरत आहे. पण, यावर आळा घालण्यासाठी या वाहनांवर कारवाई होण्यासाठी शिवशाही व्यापारी संघटना आक्रमक झाली असून अवैधरित्या तसेच ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईसाठी संबंधित प्रशासनाकडे संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
खोपोली शिळफाटा परिसर नेहमीच गजबजलेला असल्याने याठिकाणी दररोज वाहतूक कोंडीचा प्रश्न समोर येत असतो. त्यातच ओव्हरलोड साहित्य घेऊन जाणारी अवघड वाहने अनेकांना धोक्याची घंटा देत असून शिवशाही व्यापारी संघटना कोकण प्रदेश अध्यक्ष वाहतूक आघाडी संगम जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिळफाटा येथील अवैधरित्या तसेच ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी तहसीलदार, खोपोली पोलीस ठाणे, बोरघाट पोलीस ठाणे, पनवेल उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, शिळफाटा वाहतूक शाखा यांना निवेदन देण्यात आले असून संबंधित प्रशासन कधी कारवाई हे पाहणे गरजेचे आहे.
ओव्हरलोड वाहतूकीवर कारवाई न केल्यास शिवशाही व्यापारी संघटना रस्त्यावर उतरणार
याबाबत शिवशाही व्यापारी संघटना कोकण प्रदेश अध्यक्ष वाहतुक आघाडी संगम जाधव यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, येत्या आठ दिवसांत अवैधरित्या तसेच ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या या वाहनांवर बंदी घालावी तशा प्रकारची वाहने आढळल्यास त्यावर संबंधित प्रशासनाने कारवाई न केल्यास येत्या आठ दिवसानंतर शिवशाही वाहतूक आघाडी या वाहनांच्या विरोधात रस्त्यावर उतरुन या वाहनांचा अटकाव करून त्यावर कारवाई करण्यास भाग पाडेल आणि यास आपले प्रशासन तसेच परिवहन खाते जबाबदार राहील, असे मत संगम जाधव यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - रायगड जिल्ह्यातील रसायनी आपटा घेरावाडी येथे गावठी हातभट्टीवर पोलिसांची धाड