रायगड - 'फाल्गुन वद्य तृतीया' या तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती साजरी केली जाते. आज संपूर्ण राज्याप्रमाणेच रायगड जिल्ह्यातील अनेक गावात देखील मोठ्या उत्साहात मंडळांमार्फत शिवजयंती साजरी केली जात आहे. त्यासाठीच रायगड जिल्ह्यात असणाऱ्या रायगड किल्ल्यावरून भल्या पहाटेपासूनच शिवभक्तांनी शिवज्योत घेऊन गावाकडे प्रयाण केले.
हेही वाचा... यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करून विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मंडळ, महाड यांच्यामार्फत शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला किल्ले रायगडावर शिवसमाधीचे विधीवत पूजन करण्यात आले. जिल्ह्यातील अनेक मंडळांनी शिवज्योत नेण्यासाठी किल्ले रायगडावर गर्दी केली होती. यावेळी शिवाजी महाराजांच्या जयघोषाने आसमंत दुमदुमुन गेला होता.
छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे आज शिवजयंती साजरी होत आहे. यानिमित्ताने शिवभक्तांनी सकाळीच शिवज्योत घेऊन गडावरून गावाकडे प्रयाण केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, या घोषाने किल्ले रायगड परिसर दुमदुमला होता. जिल्ह्यात अनेक ठिकाणी शिवजयंतीनिमित्त पालख्या काढण्यात आल्या होत्या. ढोल ताशांच्या व पारंपरिक वेशभूषेत शिवभक्त या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते.