रायगड - बाळाचे पाय हे पाळण्यात दिसतात अशी म्हण प्रचलित आहे. ही म्हण अलिबाग तालुक्यातील लोणारे गावच्या शर्विका म्हात्रे हिने सत्यात उतरवली आहे. शर्विकाची भारतातील सर्वात लहान गिर्यारोहक म्हणून 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद झाली आहे. शर्विकाच्या या कामगिरीने अलिबागसह रायगडचे नाव उंचावले असून सर्व स्तरातून तिचे आणि तिच्या पालकांचे कौतुक केले जात आहे. शर्विकाला मिळालेला हा सन्मान तिने किल्ले रायगडावर पायी चढून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी अर्पण केला आहे.
गड किल्ले पाहण्यासाठी अनेक पर्यटक, शिवभक्त जात असतात. मात्र, पायी गड किल्ले सर करताना अनेकांची दमछाक होत असते. परंतु, शर्विका ही दीड वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड किल्ले पायी चालत जाऊन सर करीत आहे. शर्विकाचे वडील जितेन म्हात्रे आणि आई अमृता म्हात्रे यांना गड किल्यावर जाण्याची हौस आहे. मावळा प्रतिष्ठानमध्ये दोघेही सहभागी होऊन गड किल्याच्या संवर्धनाचे काम करीत आहेत. त्यामुळे शर्विकालाही लहानपणापासूनच गड किल्याचे आकर्षण झाले. सुट्टीत ती समुद्र वा इतर ठिकाणी न जाता गड किल्यावर जाण्याचा हट्ट करीत असल्याचे तिची आई अमृता म्हात्रे यांनी सांगितले. गड, किल्यावर स्वच्छता मोहिमेतही शर्विका स्वतःहून भाग घेत असते.
शर्विकाचे वडील जितेन म्हात्रे यांनी 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड' कार्यालयाकडे शर्विकाचे गड किल्यावर पायी चढतानाचे व्हिडीओ आणि कागदपत्रे पाठवली होती. ती तपासल्यानंतर शर्विकाची भारतातील सर्वात लहान गिर्यारोहक म्हणून नोंद करण्यात आलेली आहे. इंडिया रेकॉर्ड ऑफ बुककडून शर्विका हिला मेडल, प्रमाणपत्र, बुक देण्यात आले आहे.
हेही वाचा - मुंबई-पुणे रेल्वे रुळाला तडे, विस्कळीत रेल्वे वाहतूक पूर्ववत
शर्विकाने आत्तापर्यंत 11 किल्ले पायी चढून सर केले आहेत. 26 जानेवारी रोजी तिने प्रबळगड किल्ल्यावरील चढण्यास कठीण असलेला कलावंतीण किल्ला पायी चढून झेंडा फडकवला होता. शर्विकाला सर्व किल्ल्यांची नावे पाठ असून छत्रपती शिवाजी महाराज यांची गारदही पाठ आहे. भविष्यात तिला चांगली गिर्यारोहक बनविण्याचा मानस असल्याचे तिच्या पालकांनी सांगितले.
हेही वाचा - अलिबागमध्ये राबवली स्वच्छता मोहीम, सचिन धर्माधिकारींच्या वाढदिवसाचे औचित्य