रायगड - राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष खासदार शरद पवार हे 9 जून रोजी रायगड दौऱ्यावर येत आहेत. निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या नुकसानग्रस्त गावांना ते भेट देणार आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे. दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागाचा रायगड दौरा केला होता.
निसर्ग चक्रीवादळाने रायगडातील अलिबाग, श्रीवर्धन, मुरुड, नागोठणे, रोहा, माणगाव, तळा या तालुक्यात प्रचंड नुकसान झाले आहे. कोरोनानंतर रायगडावर सध्या वादळाचे संकट आल्याने शेकडो करोडोचे नुकसान झालेले आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलिबाग येथे पाहणी दौरा करून जिल्ह्यासाठी 100 कोटींची तातडीची मदत जाहीर केली आहे.
दरम्यान, शरद पवार हे उद्या 9 जूनला रायगड दौरा करणार आहेत. शरद पवार हे जिल्ह्याच्या विविध भागात फिरून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या पाहणी दौऱ्यानंतर ते केंद्राकडे रायगडासाठी निधीची मागणी करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.