रायगड - आज शाळांची घंटा वाजण्याचा मुहूर्त जिल्ह्यातील अनेक ठिकाणी टळला, तर काही ठिकाणी कोरोना नियम पाळून शाळा सुरू झाल्या आहेत. कोकण एज्युकेशन सोसायटीच्या नववी ते बारावीपर्यंतच्या शाळेचे वर्ग भरले न गेल्याने आठ महिन्यानंतर वाजणारी घंटा वाजली नाही. तर अलिबागमधील दत्ताजी खानविलकर शाळेसह जिल्ह्यातील काही शाळा आज सुरक्षित अंतर पाळून सुरू झाल्या आहेत.
शिक्षकांची कोविड तपासणी अद्यापही अपूर्ण
रायगड जिल्ह्यात नववी ते बारावीचे 9 हजार शिक्षक आहेत. या शिक्षकांची कोविड तपासणी सध्या सुरू आहे. अलिबाग येथे आरटीपीसीआर तपासणी केंद्र आहे. या ठिकाणी रोज दीडशे ते साडेतीनशे व्यक्तीची कोविड तपासणी केली जाते. त्यामुळे नऊ हजार शिक्षकांची तपासणी करून त्याचा अहवाल प्राप्त होण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे शाळा सुरू होण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
पालकांची संमती आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी घेऊनच शाळेत प्रवेश
शिक्षकांची कोविड तपासणी केली जात असताना शाळेत पाठविणाऱ्या पाल्याच्या पालकांची संमती पत्र गरजेचे आहे. तसेच काही खाजगी शाळांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी पत्रही घेतले आहेत. ते असेल तरच शाळेत प्रवेश दिला जात आहे. अलिबागमधील दत्ताजी खानविलकर शाळेमध्ये संमतीपत्र आणि आरोग्य तपासणी करूनच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे.
शाळेचे निर्जंतुकीकरण आणि विद्यार्थ्यांची तपासणी करूनच प्रवेश
शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व वर्ग शाळा प्रशासनाने निर्जंतुकीकरण करून घेतले आहेत. तसेच शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे तापमान, ऑक्सिजन लेव्हल, हात सॅनिटायझर करून वर्गात सोडले जात आहे. तर सुरक्षित अंतर ठेवून मास्क लावून विदयार्थी वर्गात बसत आहेत. तसेच तास संपल्यानंतर पुन्हा हात सॅनिटायझर केले जात आहेत.
ग्रामीण भागातील पालक संभ्रमावस्थेत
शहरात पालक वर्ग हे आपल्या पाल्याना शाळेत पाठवत आहेत. मात्र ग्रामीण भागातील पालक हे संमतीपत्र द्यायचे की नाही या संभ्रमात आहेत. त्यामुळे पाल्याला शाळेत पाठवायचे की नाही हा प्रश्न त्याच्यासमोर उभा ठाकला आहे.
हेही वाचा -राज्यात आजपासून शाळांची घंटा वाजली; जाणून घ्या कुठे उघडल्या शाळा, तर कुठे आहेत बंद
हेही वाचा - अर्णब प्रकरण : रायगड न्यायालयातील पुनर्विचार याचिका, जामीन अर्जाबाबत आजच्या सुनावणीकडे साऱ्यांचे लक्ष