छत्रपती संभाजीनगर : दिवंगत प्रमोद महाजन यांच्या हत्येमागं षडयंत्र होतं, असा दावा त्यांच्या कन्या तथा माजी खासदार पूनम महाजन यांनी केला. त्यांच्या दाव्यावर आता प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. "माझे भाऊ भाजपाचे नेते होते आणि आता केंद्रात आणि राज्यात त्यांचीच सत्ता आहे. त्यांनी सखोल चौकशी केल्यास काही बाहेर येऊ शकतं. मात्र, कोणी अडचणीत येणार असेल, तर असत्य पण सत्य म्हणून बाहेर पडू शकतं," असं प्रकाश महाजन म्हणाले.
आमच्या कुटुंबाची खूप मोठी हानी : "प्रमोद महाजन यांच्या मृत्यूला 18 वर्षांचा काळ लोटला आहे. त्यामुळं ऐन निवडणुकीच्या काळात हा प्रश्न का विचारण्यात आला? हे कळत नाही. एखाद्या बातमीला पण आयुष्य राहतं, आता हा मुद्दा बाहेर आला तरी किती दिवस त्यावर चर्चा होईल माहीत नाही. पूनमनं ते वक्तव्य केलंय. तिच्याकडं अधिक माहिती असेल, तर तिनं समोर आलं पाहिजे. आमच्या कुटुंबाची खूप मोठी हानी झाली, बदनामी झाली. यात वैयक्तिक खूप मोठं नुकसान झालं," अशी कळकळ प्रकाश महाजन यांनी व्यक्त केली.
भाजपानं चौकशी करावी : "पूनमनं प्रमोद महाजन यांच्या मृत्यूमागं षडयंत्र असल्याचं सांगितलं. त्या भाजपाच्या नेत्या आहेत. खरंतर या प्रकरणाची चौकशी करायला हवी. केंद्रात आणि राज्यात त्यांचेचं सरकार असल्यानं ते चौकशी करू शकतात. त्यांनी चौकशी केली तरी सत्य बाहेर येईल, असं नाही. कोणी अडचणीत येणार असेल, तर असत्य देखील सत्य म्हणून समोर आणलं जाऊ शकतं. ते जर षडयंत्र असेल तर खरंच खेदजनक आहे," असं प्रकाश महाजन यांनी स्पष्ट केलं.
आमच्यात कधीही वाद नव्हते : "आमच्या महाजन कुटुंबात कधीच कोणता वाद नव्हता. आमचं कुटुंब मध्यमवर्गीय होतं. आमच्यात कोणताही वाद नव्हता, हे खात्रीनं सांगू शकतो. मात्र, षडयंत्र करून त्याला कौटुंबिक वाद दाखवण्याचा प्रयत्न केला, असेल तर ते शोधावं लागेल. या घटनेत माझं खूप मोठं नुकसान झालं. माझे दोन भाऊ मला गमवावे लागले, माझ्या कुटुंबाची खूप मोठी बदनामी झाली," अशी तळमळ प्रकाश महाजन यांनी 'ईटीव्ही भारत'कडे व्यक्त केली.
पूनम महाजन यांनी नेमका काय दावा केलाय? : "माझ्या वडिलांची हत्या झाली तेव्हा हा कौटुंबिक विषय असल्याची चर्चा होती. मात्र, प्रमोद महाजन यांची राजकीय कारकीर्द पुढं जाऊ नये, यासाठी षडयंत्र होतं. त्यांना रोखण्यासाठी संपवण्यात आलं. एवढंच नाहीतर माझं लोकसभेच्या वेळी तिकीटही कापण्यात आलं. तेही एक मोठं षडयंत्र होतं. पण हे षडयंत्र कोणी रचलं? हे असं कोणी का केलं? याच्या शोधात मी बसत नाही. मात्र, हे षडयंत्र आज नाही, तर उद्या एक दिवस बाहेर येईल,"असं पूनम महाजन एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या.
हेही वाचा
- "...म्हणून योगींना महाराष्ट्रात आणलं"; 'बटेंगे तो कटेंगे'वरून शरद पवारांचा घणाघात, अशोक चव्हाणांवरही साधला निशाणा
- "भाऊसाहेब कांबळेंनी विश्वासघात केला, त्यांनी बॅनरवर माझे फोटो...", विखे पाटलांचा हल्लाबोल
- राज ठाकरेंकडं फडणवीसांची स्क्रिप्ट; ईडीची टांगती तलवार असल्यानं त्यांना बोलावं लागते, संजय राऊतांचा हल्लाबोल