रायगड- कोरोना विषाणूची लागण होऊ नये यासाठी सर्वजण काळजी घेत आहेत. शासन, प्रशासन असो वा स्थानिक प्रशासन असो प्रत्येकजण आपल्या नागरिकांसह कर्मचाऱ्याचीही काळजी घेत आहेत. अलिबाग तालुक्यातील चेंढरे ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी स्वतः स्वयंचलित निर्जंतुकीकरण कक्ष तयार केला आहे. त्यांच्या या यशस्वी प्रयोगामुळे फवाऱ्यातून येणाऱ्या निर्जंतुक पाण्याची बचतही होत आहे. जिल्ह्यातील हे पहिलेच स्वयंचलित कोरोना निर्जंतुकीकरण कक्ष ठरले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात शहरी भागात कोरोना निर्जंतुकीकरण कक्षाची उभारणी केली गेली आहे. या कक्षातून जाणाऱ्या नागरिकांवर निर्जंतुकीकरण पाण्याची फवारणी केली जाते. मात्र, ही फवारणी सुरू असताना, कोणी व्यक्ती या कोरोना कक्षातून जाणार नसला तरी फवारणी ही सुरुच राहायची. त्यामुळे पाण्याची आणि निर्जंतुकीकरण औषधांची नासाडीही होत होती. तसेच निर्जंतुकीकरण फवारणी सुरू करण्यासाठी व्यक्तीचीही गरज भासते. त्यामुळे एकीकडे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोरोना निर्जंतुकीकरण कक्षाची स्थापना केली असली तरी पाण्याची नासाडीही तेवढीच होत होती.
चेंढरे ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी यावर मात केली असून कार्यालयात स्वयंचलित निर्जंतुकीकरण कक्ष तयार केला आहे. ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या काळात हद्दीतील कामे आटोपून आपल्या फावल्या वेळेत हे स्वयंचलित निर्जंतुकीकरण मशीन आणि कक्ष तयार केला आहे. या कक्षातून जाताना स्वयंचलित फवारे सुरू होतात. बाहेर पडल्यानंतर आपणहून बंद होतात. हे बनविलेले स्वयंचलित यंत्र असल्याने मानवरहित बनविलेले हे जिल्ह्यातील पहिलेच कोरोना निर्जंतुकीकरण कक्ष ठरले आहे.