पनवेल - लहान मुलांच्या हृदयाच्या आजारांवरील उपचारासाठी असलेल्या खारघरमधील 'श्री सत्यसाई संजीवनी हॉस्पिटल'चा पहिला वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. यावेळी सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते या हॉस्पिटलमधून हृदयाच्या कर्करोगावरील यशस्वी शस्त्रक्रिया करून जीवदान मिळालेल्या 100 मुला-मुलींना 'लाईफ सर्टिफिकेट'चे वाटप करण्यात आले. प्रमाणपत्र मिळाल्यानंतर लहानग्या मुला-मुलींच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य पाहून सचिन तेंडुलकर यांनी श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटलच्या डॉक्टरांचेही कौतुक केले.
![shree satya sai hospital](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/5199597_sachin.jpg)
जन्मत:च हृदयरोगासारखे संबंधित आजार असलेल्या मुलांचे प्रमाण भारतात मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे २ वर्षांपूर्वी खारघरमधील सेक्टर ३८ येथे 'श्री सत्य साई संजीवनी इंटरनॅशनल सेंटर फॉर चाइल्ड हार्ट केअर सेंटर' हे रुग्णालय सर्वांसाठी खुले करण्यात आले. याठिकाणी हृदयावरील सर्जरी सारख्या अवघड आणि सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणाऱ्या शस्त्रक्रिया अगदी मोफत करण्यात येतात.
हेही वाचा - पनवेल : धावत्या कारने पेट घेतल्याचा 'थरार'; नागरिकांच्या सतर्कतेने टळला अनर्थ
आतापर्यंत या रुग्णालयात ७५०० लहान मुलं आणि ५५० पेक्षा जास्त गर्भवती महिलांची तपासणी करण्यात आली आहे. ज्या हार्ट सर्जरीसाठी न्यूझीलंड सारख्या देशात ३० लाख रुपये खर्च येतो ती सर्जरी या रुग्णालयात पूर्णपणे मोफत केली जाते. हृदयाची शस्त्रक्रिया यशस्वी करून जीवदान प्राप्त झालेल्या लहान मुलांना रुग्णालयाच्या वर्धापन दिनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते लाईफ सर्टिफिकेट वाटण्यात आले. श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटल हे गरीब घरातील कुटुंबीयांसाठी मंदिर बनले आहे. यात डॉक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांची मेहनत ही वाखाणण्याजोगी असल्याचे सचिन तेंडुलकर यावेळी म्हणाले. यावेळी सिडको एमडी लोकेश चंद्र, सिडको अधिकारी इंद्रा मालो, पोलीस आयुक्त संजय कुमार बर्वे हे उपस्थित होते.
हेही वाचा - अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा आरोपी 24 तासात गजाआड