रायगड - रोहा तालुक्यात तांबडी केळघर रस्त्यावर कवळटे गावाजवळ रस्त्यावर दरड कोसळली असुन रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून रस्ता मोकळा करण्याची उपाययोजना करत आहेत. पुढच्या दोन तासात रस्ता मोकळा होईल, असे प्रशासनाने सांगितले आहे. मात्र रोहाकडे येणारा व जाणारा मार्ग बंद झाल्याने गावाचा संपर्क तुटला आहे.
जिल्ह्यात चार दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून आज पाचव्या दिवशी पावसाचा जोर कमी असला तरी रात्री मुसळधार पाऊस पडला आहे. मुसळधार पावसाने रोहा तालुक्यातील तांबडी केळघर रस्त्यावर पहाटे साडेपाच वाजता कवळटे गावाजवळ असलेला डोंगर भाग पावसाने ठिसूळ झाला असून दरड कोसळून रस्त्यावर पडली आहे. त्यामुळे हा रस्ता बंद झाला आहे.
दरड कोसळल्याने रोहाकडून तळा, मुरुड कडे जाणारा तर रोह्याकडे येणारा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे येथील प्रवाशांचे व नागरिकांचे हाल झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून रस्त्यावर पडलेली दरड बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. दोन ते तीन तासात हा मार्ग मोकळा होईल असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.