रायगड - चार दिवसांपासून मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याने जिल्ह्यात थैमान माजले होते. मुसळधार पावसाने जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली असून राज्य शासन तसेच अंतर्गत रस्तेच वाहून गेले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांना, महामार्गाला भेगा पडल्या आहेत. दक्षिण रायगडमध्ये रस्त्याची दुर्दशा सर्वाधिक झाली आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या वाहतूक सेवेवर परिणाम झाला असून गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे पाऊस थांबल्यानंतर या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला आधी पावले उचलावी लागणार आहेत.
जिल्ह्यात चार दिवसांपूर्वी हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला होता. जिल्हा प्रशासनानेही हाय अलर्ट जाहीर केला होता. मात्र निसर्गाच्या रौद्ररूपापुढे माणूस हतबल झाला. पावसाचे रुद्ररुप जिल्ह्यात हाहाकार माजवून गेले आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असून सरकारच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांचीही मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.
पावसाने पूरपरिस्थिती निर्माण झाली असताना जिल्ह्यातील अंतर्गत रस्ते, राज्य मार्ग, महामार्ग हे पावसाने वाहून गेले. महाडमध्ये किल्ले रायगड विभागातील सावरट-बांधणीचा माळ रस्ता महाकाय दरडीसोबत वाहून गेला. तर, पोलादपूर मधील कोतवाल रेववाडी या रस्त्याला मोठी भेग पडली आहे. महाडमधील मुंबई-गोवा महामार्गावर गांधार पुलावर भेगा पडल्या आहेत. माणगाव, श्रीवर्धनमध्येही काही रस्त्यांची दुर्दशा झाली आहे.
रोहा शहरात पुरामुळे अष्टमी रस्त्याला भेगा पडल्या असून नागोठणे रस्त्यावरील मोरीचा रस्ताही खचला आहे. पाली पुलावर मोठे भगदाड पडले आहे. माणगाव मधील कुंभे धबधब्यावर जाणाऱ्या रस्त्यालाही भेगा पडल्या असल्याने हा रस्ताही निकामी झाला आहे. जिल्ह्यातील अनेक भागात रस्त्याची पावसाने दुर्दशा झाली आहे. वाहून गेलेल्या व भेगा पडलेल्या रस्त्यांमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच या मार्गावरची वाहतूकही बंद झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांचेही हाल झाले आहेत. मुसळधार पावसाने आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे वाताहत झालेल्या रस्त्याची दुरुस्ती प्रशासनाकडून लवकरात लवकर सुरू करून वाहतूक सुरू होणे गरजेचे आहे.