रायगड : नद्या समाजाला प्रेरणा देतात त्याच आपण उद्धवस्त करत आहोत. देशात, राज्यात अनेक नद्या आहेत, नदी काठी संस्कृती वाढत असते, मानवी जीवनात महत्त्वपूर्ण स्थान असणाऱ्या नद्या प्रदूषीत करण्याचे काम आपण करत आहोत. असे असताना रोह्यातील कुंडलिका नदीचे संवर्धन आज केले जात आहे, कुंडलिका स्वच्छ करण्याचा संकल्प आज रोहेकरांनी केला आहे. ही चांगली बाब आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
रोहा, म्हसळ्यातील विकासकामांचे शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन
आज शरद पवार हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी यावेळी म्हसळा येथे पंचायत समितीच्या नव्या इमारतीचे लोकार्पण केले, तसेच वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या विज्ञान भवनाचे बॅ. ए. आर. अंतुले विज्ञान भवन असे नामकरण पवारांच्या हस्ते करण्यात आले. तर रोहा येथे नगर पालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या कुंडलीका नदी संवर्धन प्रकल्पाचे लोकार्पण आज पवारांच्या हस्ते संपन्न झाले.
फलोत्पादन, पर्यटन आणि उद्योगावर आधारीत विकासाची संकल्पना
नदी ही आपली संस्कृती आहे, असे म्हणत पवारांनी यावेळी रोहेकर करत असलेल्या कुंडलीका नदी संवर्धनाचे कौतुक केले, तसेच प्रत्येक नदीचे संवर्धन व्हायला पाहिजे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर फलोत्पादन, पर्यटन आणि उद्योगावर आधारीत कोकणाचा विकास व्हावा अशी संकल्पाना देखील त्यांनी यावेळी मांडली. या कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांची उपस्थिती होती.