रायगड - रायगड लोकसभा मतदारसंघात पुन्हा विद्यमान खासदार केंद्रीय मंत्री अनंत गीते विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे यांच्यात लढत होत आहे. ही लढत अत्यंत तुल्यबळ मानली जात आहे. 2014 च्या मोदी लाटेत शिवसेनेचे अनंत गीते हे अवघ्या 2 हजार 100 मतांनी विजयी झाले होते. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शेकाप आघाडीत सामील झाल्याने सुनील तटकरेंना बळ मिळाले आहे. त्यामुळे गीते हॅट्रीक करणार की तटकरे बाजी मारत दिल्ली गाठणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
मतदारसंघाची पार्श्वभूमी
रायगड लोकसभा मतदारसंघ हा पूर्वी कुलाबा लोकसभा मतदारसंघ होता. या मतदार संघावर 1952 पासून 2009 पर्यंत काँग्रेस व शेकापचे वर्चस्व होते. 1952 ला पहिल्या निवडणुकीत कुलाबा लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे चिंतामण देशमुख विजयी झाले होते. त्यांनी शेकापचे उमेदवार राजाराम राऊत यांचा पराभव केला होता. कुलाबा जिल्ह्याचे पहिले खासदार म्हणून चिंतामण देशमुख यांना मान मिळाला आहे. त्यानंतर 1957 ला शेकापचे राजाराम राऊत, 1962 भास्कर दिघे (काँग्रेस), 1967 दत्तात्रय कुंटे (शेकाप), 1971 शंकर सावंत (काँग्रेस), 1977 दिनकर पाटील (शेकाप), 1980 अंबाजी पाटील (काँग्रेस आय), 1984 दिनकर पाटील (शेकाप), 1989, 1991, 1996 बॅ. ए. आर. अंतुले (काँग्रेस आय), 1998, 1999 रामशेठ ठाकूर (शेकाप) हे कुलाबा लोकसभा मतदार संघातून काँग्रेस, शेकापचे उमेदवार निवडून आले होते.
2014 ची परिस्थिती
2004 ला कुलाबाचे नाव बदलून रायगड हे नाव जिल्ह्याला देण्यात आले. रायगड लोकसभा मतदारसंघातून 2004 ला पुन्हा काँग्रेसचे बॅ. ए. आर. अंतुले निवडून आले. 2009 व 2014 च्या निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघ शिवसेनेने खेचून आणला होता. तर 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसचा हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आला. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांचा शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांनी पराभव केला होता.
जातीय समीकरणे
रायगड लोकसभा मतदारसंघात कुणबी, आगरी, मराठा, माळी या जातीचे वर्चस्व आहे. तसेच दलित, मुस्लिम, जैन, मारवाडी, गुजराती, गवळी या जातीचे मतदार निर्णायक आहेत. अनंत गीते हे कुणबी समाजाचे असल्याने कुणबी समाजाची मते जास्त असल्याने याचा फायदा गीतेंना नेहमीच झाला आहे. त्यामुळे ही मते खेचून घेण्यासाठी सुनील तटकरे यांचा प्रयत्न राहणार आहे. श्रीवर्धन, महाड, गुहागर, दापोली या मतदारसंघात कुणबी समाज जास्त आहे.
जिल्ह्यातील विकास अजूनही रखडलेलाच
रायगड हा पर्यटन जिल्हा आहे. त्यामुळे लाखो पर्यटक जिल्ह्यात पर्यटनास येत असतात. मात्र, पर्यटनाला हवी तशी चालना मिळालेली नाही. मुंबई गोवा महामार्ग अद्यापही रखडलेला आहे. अद्यावत रुग्णालयाची वानवा, रोजगार प्रश्न, उच्च शिक्षणाची वानवा, पाणी प्रश्न, रस्ते, बेरोजगारी, रेल्वे, प्रकल्पग्रस्तांचे अपुरे प्रश्न, नवीन प्रकल्प उभारणी नाही, शेतकरी, मच्छिमारांचे प्रलंबित प्रश्न, ऐतिहासिक स्थळे, वास्तू, मंदिरे दुर्लक्षित असल्याने जिल्ह्याचा विकास खुंटलेला आहे.
मतदारसंघातील पक्षीय बलाबल
रायगड लोकसभा मतदारसंघ हा अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड व रत्नागिरीमधील गुहागर, दापोली अशा ६ विधानसभा मतदारसंघांनी बनलेला आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे 3, शेकाप 2 तर शिवसेनेचा १ आमदार आहे. त्यामुळे पक्षीय बलानुसार आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांचे पारडे जड आहे. मात्र, असे असूनही अनंत गीते 2009, 2014 असे दोन टर्म निवडून आलेले आहेत.
दापोली - संजय कदम (राष्ट्रवादी काँग्रेस)
गुहागर - भास्कर जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस)
श्रीवर्धन - अवधूत तटकरे ( राष्ट्रवादी काँग्रेस)
अलिबाग - सुभाष पंडित (शेकाप)
पेण - धैर्यशील पाटील (शेकाप)
महाड - भरत गोगावले (शिवसेना)
2014 च्या लोकसभा निवडणुकीत शेकापने आपला स्वतंत्र उमेदवार उभा केला होता. मात्र, यावेळी शेकाप हा आघाडीत सामील झाला असल्याने सुनील तटकरेंना फायदा होणार आहे. त्याचबरोबर दापोलीचे शिवसेनेचे आमदार सूर्यकांत दळवी हे नाराज असल्याने त्यांची भेट तटकरे यांनी घेतली होती. त्यामुळे दळवीचा फायदा तटकरेंना होणार आहे. तर खेड चिपळूणचे भास्कर जाधव व गुहागरचे संजय कदम हे दोन आमदार राष्ट्रवादीचे असल्याने तटकरे यांच्या मताधिक्यात यावेळी वाढ होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसची नाराजी तटकरेंना तापदायक
काँग्रेसचे नेते हे जुन्या गोष्टी सर्व विसरून एकत्र आले असले तरी कार्यकर्त्यांमध्ये अजूनही तटकरेबाबत नाराजी आहे. तसेच शेकाप हा काँग्रेसचा पारंपारीक राजकीय शत्रू असल्याने याबाबतही काही प्रमाणात नाराजी असल्याने सुनील तटकरेना काँग्रेस, शेकाप कार्यकर्त्यांची मते मिळवताना कसरत करावी लागणार आहे. तसेच घरातील असलेले आमदार अवधूत तटकरे, अनिल तटकरे यांची नाराजीही सुनील तटकरेंना तापदायक ठरणार आहे. तसेच २ अपक्ष सुनील तटकरे हे सुद्धा तापदायक ठरणार आहेत.
अनंत गीते हे सलग २ टर्म खासदार म्हणून निवडून येत आहेत. मात्र, राष्ट्रवादीतून शिवसेना, भाजपमध्ये आलेले नेते, माजी मंत्री रवींद्र पाटील, नविद अंतुले यांचा फायदा गीते यांना निवडणुकीत होणार आहे. तसेच भाजपचे जिल्ह्यात वाढलेले प्रस्थ याचा फायदा गीतेंना होणार आहे. शिवसेनेचा लोकसभा मतदारसंघात एकच आमदार असला तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेचे प्राबल्य आहे. निष्कलंक नेता अशी गीतेंची छाप आहे. याचा फायदा गीतेंना होऊ शकतो. तसेच कुणबी, मराठा मते व तटकरे यांच्याबाबत असलेली नाराजी याचा फायदा गीते यांना मिळू शकतो. त्याचबरोबर तरुणांमध्ये असलेली नरेंद्र मोदी यांची छबी आजही त्याच्या मनात असल्याने त्याचा फायदा गीते यांना मिळणार आहे.
2019 मधील मतदार संख्या
पुरुष मतदार - 8 लाख 03 हजार 072
महिला मतदार - 8 लाख 34 हजार 766
अनिवासी मतदार - 15
सर्व्हिसेस मतदार - 1 हजार 309
एकूण मतदार - 16 लाख 39 हजार 162
रायगड लोकसभेत दोन्ही उमेदवार हे तुल्यबळ असले तरी वंचित बहुजन आघाडी, बसप, अपक्ष यांच्या मतांचा फटका हा दोन्ही उमेदवारांना बसणार आहे. त्यामुळे सुनील तटकरे व अनंत गीते हे दोघेही जिंकण्याचा दावा करत असले तरी शेवटच्या मतपेटीपर्यंत ही लढत झुंजणार हे मात्र नक्की. मात्र, एकंदरीत परिस्थितीत दोन्ही उमेदवार हे तुल्यबळ असल्याने मतदार कोणाच्या पारड्यात आपले मत टाकणार हे २३ मे ला निकालानंतर स्पष्ट होणार आहे.