रायगड - माणगाव तालुक्यातील गोरेगाव जवळील सोन्याची वाडी येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या ६० ग्रामस्थांची बचाव पथकाने सायंकाळी सुटका केली आहे. त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. यामध्ये महिलांसह लहान मुलांचाही समावेश आहे.
संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे सोन्याची वाडी या वस्तीला पाण्याचा वेढा पडला आणि सर्व ग्रामस्थ आत अडकून पडले. पाण्याची पातळी वाढत गेल्याने सारेच भयभीत झाले होते. याबाबत प्रशासनाला माहिती मिळताच माणगावच्या प्रांताधिकारी प्रचाली दिघावकर सर्व महसूल कर्मचाऱ्यासह सोन्याची वाडी येथे दाखल झाल्या. कोलाड येथील महेश सानप यांच्या राफटर पथकाला तत्काळ पाचारण करण्यात आले. पथकातील सदस्यांनी बोटीच्या सहाय्याने वस्तीवर जावून सर्व ग्रामस्थांना पुरातून बाहेर काढून त्याची सुटका केली.
या सर्व ग्रामस्थांची आता जवळच्याच नागाव येथील प्राथमिक शाळेत तसेच दत्तमंदिरात तात्पुरती निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सोन्याची वाडी या वस्तीला दरवर्षी पावसाळ्यात अशाच प्रकारे पुराचा सामना करावा लागतो. मात्र, आता त्यावर काहीतरी कायमस्वरुपी उपाय योजना करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांची केली आहे.