रायगड - 'नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने नवीन पुनर्वसन धोरण तयार केले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा झाल्यानंतर पॅकेज जाहीर केले जाईल', अशी प्रतिक्रिया मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. गुजरातमध्ये पंतप्रधानांनी जाऊन पॅकेज जाहीर केले. महाराष्ट्राला अजून का नाही? याचं उत्तर विरोधी पक्षाने दिले पाहिजे, असा टोलाही विरोधी पक्षाच्या नेत्यांना विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे.
माणगाव, म्हसळा, निजामपूर, श्रीवर्धन येथे केली पाहणी
तौक्ते चक्रीवादळात नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आज (20 मे) रायगड दौऱ्यावर आहेत. निजामपूर, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन या भागात त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुनर्वसन धोरणाबाबत माहिती देऊन पंतप्रधानांसह भाजपावर टीकास्त्र सोडले. दरम्यान, पालकमंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, काँग्रेस राज्य उपाध्यक्ष माणिक जगताप या दौऱ्यात उपस्थित होते.
'लवकरच नवीन पुनर्वसन धोरण आखणार'
'नैसर्गिक आपत्ती काळात नागरिकांना सुस्थळी हलवावे लागते. कायमस्वरूपी या नागरिकांची राहण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. यासाठी नवीन पुनर्वसन धोरण राज्यातर्फे तयार केले जात आहे. कॅबिनेटसमोर हे धोरण ठेवण्यात आले होते. यावेळी काही मंत्र्यांनी यात काही दुरुस्ती सुचवली आहे. लवकरच हे नवीन धोरण जाहीर केले जाईल. पुनर्वसनबाबत जिल्हाधिकारी यांना अधिकार देणे गरजेचे आहे', असेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
'विरोधक नुसतेच बिनबुडाचे आरोप करतात'
'विरोधकांना काहीच काम नाही. वस्तुस्थिती न पाहता बिनबुडाचे आरोप करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातमध्ये पाहणीसाठी जाऊन पॅकेज जाहीर करीत आहेत. महाराष्ट्रासाठी का नाही? याचे उत्तर आधी विरोधी पक्षाने द्यावे. निसर्ग चक्रीवादळ आले तेव्हाही महाविकास आघाडी सरकार कोकणाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आताही आम्ही कोकणवासियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. निसर्ग चक्रीवादळावेळी निकष बदलून नुकसानग्रस्तांना मदत देण्यात आली', असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.
'मुख्यमंत्री दौऱ्यावरून आल्यानंतर पॅकेज देणार'
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या (21 मे) कोकण दौऱ्यावर येत आहेत. ते दौऱ्यावरून आल्यानंतर नुकसानग्रस्त जिल्ह्यांना पॅकेज जाहीर केले जाईल', असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - पत्नीच्या डोक्यात दगड घालून खूनप्रकरणी आरोपीला बेड्या