नवी मुंबई - कोरोनामुळे अनेकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अनेकांचे उद्योगधंदे बंद पडले आहेत. त्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लगत आहे. अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही शैक्षणिक संस्थेनी फी वाढ करू नये, तसेच पालकांनी त्यांना शक्य होईल तशी टप्प्याटप्प्याने फी भरावी, असे शासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र असे असतानाही पनवेलमधील दिल्ली पब्लिक स्कूल फीच्या नावावर अतिरिक्त शुल्क वसूल करत असल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे.
या शाळेत 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांकडून 80 हजरांपासून ते 1 लाख 20 हजार रुपयांपर्यंत फी आकारली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फी कमी करण्यात यावी, यासाठी पालकांनी शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेतली. कोरोनामुळे सर्व शाळा बंद आहेत. मात्र दिल्ली पब्लिक स्कूल पालकांकडून फी वसूल करत आहे. बस बंद असूनही ट्रान्सपोर्ट शुल्क व इतर सांस्कृतिक शुल्क आकारण्यात येत आहे. त्यामुळे 40 ते 50 हजार रुपयांना फटका बसतो आहे. जे फी भरत नाहीत, त्यांना ऑनलाइन वर्गात बसू दिले जात नाही. त्यांचे आयडी ब्लॉक करण्यात आले आहेत, अशा तक्रारी संतप्त पालकांनी शिक्षण अधिकाऱ्यांकडे केल्या आहेत. तथापि, दुसरीकडे आम्ही नियमानुसारच फी वसूल करत असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले आहे.