रायगड - लॉकडाऊनच्या काळात अन्न धान्याची टंचाई भासत असतानाच रेशनवरील धान्याचा काळाबाजार होत असल्याची बाब समोर आली आहे. अलिबाग तालुक्यातील तीन रेशन दुकानदारांवर धान्याचा काळा करीत असल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना सारखी राष्ट्रीय आपत्ती आली असताना यातही फायदा उठविण्याचे काम हे नतभ्रष्ट करीत आहेत. धान्याचा काळा बाजार करणार्याविरोधात मांडवा सागरी आणि अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिघोडी येथील रास्तभाव दुकान परवाना धारक महेंद्र ठाकूर व त्याचा नोकर महेश ठाकूर यांच्याविरोधात मांडवा सागरी पोलीस ठाण्यात, तर अलिबाग ठिकरूळ नाका येथील राहुल विलास जगे वय-37, विलास जयराम जगे वय-70 आणि रामनाथ येथील प्रवीण रामचंद्र रणवरे रा. रामनाथ ता.अलिबाग व रामचंद्र शंकर रणवरे या चार जणाविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनासारखी राष्ट्रीय आपत्ती आली असताना सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. सर्व समान्यासह मजूर, कामगार, हातावर कामवणाऱ्या लोकांचे हाल झाले आहेत. यासाठी शासनाने रास्त भाव धान्य दुकानावर नागरिकांना 2 ते 3 रुपयात धान्य, कडधान्य उपलब्ध केले आहेत. असे असताना काही रास्त धान्य भाव दुकानदार रेशनकार्ड नसलेल्या लोकांना जास्त भावाने धान्य देत आहेत. त्यामुळे रेशनकार्ड धारकांना धान्य मिळण्यास अडचण निर्माण झाली आहे. याबाबत जिल्हा पोलिस आणि जिल्हा पुरवठा विभागाने कारवाईचे सत्र सुरू केले आहे. या कारवाईत पोलिसांनी तालुक्यातील तीन रास्त धान्य भाव दुकानदारावर कारवाई केली आहे.