रायगड - जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि विषय समिती सभापतीची निवडणूक 3 जानेवारी 2020 ला होणार आहे. सध्या जिल्हा परिषदेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाकडे (शेकाप) आहे. राज्यात झालेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाविकास आघाडी समिकरणामुळे जिल्हा परिषदेतील हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे शेकापला सत्तेतून दूर ठेवले जाणार की नवी समीकरणे जुळली जाणार याबाबत तर्क लावले जात आहेत.
हेही वाचा - साखर क्षेत्रात महाराष्ट्राला पुन्हा अव्वल क्रमांकावर आणायचे आहे - शरद पवार
रायगड जिल्हा परिषदेची 2017 मध्ये निवडणूक होऊन राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप अशी आघाडी सत्तेवर आली. जिल्हा परिषदेमध्ये शेकाप 23, शिवसेना 18, राष्ट्रवादी 12, काँग्रेस 3 आणि भाजप 3 असे एकूण 59 सदस्यांचे पक्षीय बलाबल आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप यांची आघाडी होऊन अध्यक्ष, महिला बालकल्याण, शिक्षण आरोग्य सभापती राष्ट्रवादीकडे तर अर्थ व बांधकाम, कृषी, समाजकल्याण सभापती शेकापकडे अशी वाटणी झाली होती. अडीच वर्षाचा कार्यकाळ संपला असून अध्यक्ष आणि विषय समिती सभापती पदासाठी 3 जानेवारी रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. यावेळी आघाडीकडून शेकापकडे अध्यक्ष पद जाणार आहे.
रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी अनुसूचित जमाती महिला आरक्षण आहे. शेकापच्या योगिता पारधी, पदी ठाकरे (पनवेल), काँग्रेसच्या अनुसया पादीर (कर्जत), शिवसेनेच्या सहारा कोळंबे (कर्जत) या चार महिला उमेदवार अनुसूचित जमातीमधील अध्यक्ष पदाच्या दावेदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप आघाडी असल्याने यावेळी शेकापला अध्यक्ष पद मिळणार आहे. त्यामुळे शेकापकडून योगिता पादीर यांचे नाव आघाडीवर आहे.
महाविकास आघाडी सत्तेत असल्याने रायगड जिल्हा परिषदेमध्ये सत्ता समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस खासदार सुनील तटकरे हे शेकाप बरोबर असलेली आघाडी धर्म पाळणार असल्याचे बोलले जात आहे. तर शिवसेनेकडून शेकापला जिल्ह्यात विरोध असल्याने राज्यातील समिकरणाचा परिणाम जिल्हा परिषदेत कितपत होणार हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत चमत्कार घडणार की जैसे थे स्थिती राहणार हे 3 जानेवारी रोजी कळणार आहे.
हेही वाचा - 'कमी आमदार असतानाही भाजपवर मात'