रायगड - रायगड लोकसभा मतदार संघ हा नेहमी निवडणुकीत चर्चेचा विषय असतो. येथील निकाल हे दरवेळी अनपेक्षित लागतात. कुलाबा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार व केंद्रीय मंत्री बॅ. ए आर. अंतुले यांना 1999 मध्ये शेकापचे रामशेठ ठाकूर तर 2009 मध्ये शिवसेनेचे अनंत गीते यांनी पराभूत केले होते. यंदाही केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या विरोधात सुनील तटकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. म्हणून 'केंद्रीय मंत्र्यां'ना हरवण्याची परंपरा कायम राहणार की मोडीत निघणार यांची चर्चा मतदारसंघात रंगली आहे.
कुलाबा लोकसभा मतदार संघात काँग्रेसचे नेते बॅ. ए. आर. अंतले हे 4 वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. 1996 मध्ये बॅ. ए. आर. अंतुले हे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर ते केंद्रीय आरोग्यमंत्री झाले. त्यानंतर झालेल्या 1998 व 1999 च्या लोकसभा निवडणुकीत शेकापच्या रामशेठ ठाकूर यांनी त्यांना पराभूत केले. त्यानंतर 2004 साली कुलाबा जिल्ह्याचे नामांतर होऊन रायगड जिल्हा हे नाव झाले. त्यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत बॅ. ए. आर. अंतुले हे खासदार म्हणून निवडून आले.
त्यानंतर 2004 च्या लोकसभा निवडणुकीत बॅ. ए. आर. अंतुले निवडून आल्यानंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात अल्पसंख्यांक खात्याचे मंत्रिपद म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर 2009 च्या लोकसभा निवडणुकीत बॅ. ए. आर. अंतुले यांनी केंद्रीय मंत्री असताना निवडणूक लढवली. यावेळी शिवसेनेच्या अनंत गीते यांनी त्याचा पराभव केला. बॅ. ए. आर. अंतुले केंद्रीय मंत्री असतानाही त्यांना 2 वेळा पराभवाला सामोरे जावे लागले.
यंदाच्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री अनंत गीते व सुनील तटकरे यांच्यात खरी लढत होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री म्हणून निवडणूक लढविताना अंतुले याना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे हीच परंपरा यावेळीही राखली जाऊन तटकरे जिंकणार की गीते ही परंपरा मोडणार हे 23 मे'ला मतमोजणी नंतर स्पष्ट होणार आहे. मात्र सद्या तरी जिल्ह्यात यावरून चर्चेला उधाण आलेले आहे.