रायगड - मुंबई, राज्य, परराज्य, परदेशातून आलेल्या जिल्ह्यातील लाखो चाकरमान्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने होम क्वारंटाईन ठेवले आहे. असे असतानाही अनेक जण बेफिकीरपणे बाहेर फिरत असतात. यासाठी जिल्हा प्रशासनाने होम क्वारंटाईन असणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी सीक्यूएमएस हे अॅप तयार केले आहे. त्यामुळे आता अॅपच्या माध्यमातून जीपीएसद्वारे होम क्वारंटाईन असणाऱ्या व्यक्तिंच्या हालचालीवर करडी नजर राहणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष आणि कॉल सेंटर तयार करण्यात आले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात, देशात वाढू लागल्याने जिल्ह्याबाहेर कामानिमित्त असणारे लाखो चाकरमानी हे जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्याच्या येण्याने रायगडकरांच्या डोक्याचा ताप वाढला आहे. असे असले तरी प्रशासनाने आलेल्या नागरिकांना होम क्वारंटाईन केले असून त्याची पूर्ण माहिती संग्रहित केली आहे. होम क्वारंटाईन असलेल्या व्यक्तीवर लक्ष राहावे यासाठी प्रशासनाने एक अॅपही तयार केले आहे.
'कॅलीब्री टेक्नॉलॉजी' या कंपनीकडून प्रशासनाने 'सीक्यूएमएस' हे ऍप तयार केले आहे. यामध्ये होम क्वारंटाईन असणाऱ्या व्यक्तीची मोबाईल नंबरसह संपूर्ण माहिती संगणकात संग्रहित केली आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एक नियंत्रण कक्ष आणि कॉल सेंटर तयार केले आहे. कॉल सेंटरमधील कर्मचारी होम क्वारंटाईन असणाऱ्या व्यक्तीस मोबाईलवर फोन करून सीक्यूएमएस या अॅपची लिंक मोबाईलवर पाठवत आहेत. हे अॅप मोबाईलवर डाउनलोड करण्यास सांगून ओटीपीद्वारे सुरू करण्यास सांगत आहेत.

होम क्वारंटाईन असणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईलवरील जीपीएस अॅक्टिव्ह होऊन त्याच्या प्रत्येक हालचालीवर नियंत्रण कक्षातून नजर ठेवली जात आहे. या अॅपमुळे होम क्वारंटाईन व्यक्ती घरातून बाहेर पडून कुठे कुठे गेला याची इत्थंभूत माहिती जीपीएसद्वारे मिळत आहे. होम क्वारंटाईन असणाऱ्या व्यक्तीवर नजर ठेवण्यासाठी हे अॅप तयार करण्यात आले असून त्या प्रत्येक व्यक्तीला फोन करून हे अॅप डाउनलोड करण्यास सांगितले जात आहे. जे अॅप डाउनलोड करीत नाहीत त्याच्या घरी प्रशासनाचा कर्मचारी पाठवून अॅप डाउनलोड करण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे होम क्वारंटाईन व्यक्तीवर आता प्रशासनाची पूर्ण नजर राहणार आहे, अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी भरत शितोळे यांनी दिली.