रायगड- मानसिक आजाराला कंटाळून एकाने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. सादिक महंमद सय्यद (वय 46) असे उडी मारलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मात्र या घटनेने जिल्हा सामान्य रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या आधीही जिल्हा रुग्णालयात उडी मारून आत्महत्या केल्याच्या दोन घटना घडल्या आहेत.
सादिक सय्यद हे तीन दिवसांपासून अलिबाग येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात मानसिक आजारावर उपचार घेत होते. मानसिक रुग्ण असल्याने त्यांना एकटे सोडले जात नव्हते. आज 26 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सादिक हे कोणासही न सांगता वार्डमधून बाहेर पडले आणि तडक रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर जाऊन वरून खाली उडी मारली. खाली असलेल्या लादीवर आपटून सादिक हे गंभीर जखमी झाले. रुग्णाने उडी मारल्याची बातमी कळताच जिल्हा रुग्णालय प्रशासनाची धावपळ सुरू झाली. गंभीर जखमी झालेल्या सादिक यांना डॉक्टरांनी त्वरित मुंबई येथे जेजे रुग्णालयात हलविण्यास सांगितले. मुंबई येथे नेताना पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात त्यांना नेण्यात आले. तपासणी केल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर त्यांचा मृतदेह पुन्हा अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
जिल्हा रुग्णालयातील उपचार घेत असलेल्या रुग्णाने उडी मारून आत्महत्या केली असल्याने रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सादिक हे वार्डच्या बाहेर जाताना तेथील कर्मचाऱ्यांनी बघितले कसे नाही असा, प्रश्नही यामुळे उपस्थित होत आहे.