रायगड - रायगड लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार अनंत गिते आणि राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार गेल्या ५ वर्षात अनंत गिते यांच्या संपत्तीत २ कोटी ७५ लाखांची तर सुनील तटकरे यांच्या मालमत्तेत २ कोटीं ६८ लाखांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते रायगड लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहेत. त्यांनी २०१४ मधील लोकसभा निवडणूकीत निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ४ कोटी ४४ लाख रुपयांची मालमत्ता असल्याचे नमुद केले होते. तर २ कोटी ३९ लाख रुपयांची लायबीलिटी असल्याचे जाहीर केले होते. २०१९ मध्ये होत असलेल्या निवडणूकीसाठी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात एकुण ७ कोटी १९ लाख १० हजारांची संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे. यात १ कोटी ७४ लाख ८८ हजार २६९ रुपयांच्या जंगम तर ५ कोटी ४४ लाख २२ हजार २६८ रुपयांची स्थावर मालमत्तेचा समावेश आहे. म्हणजेच गेल्या ५ वर्षात अनंत गिते यांच्या मालमत्तेत २ कोटी ७५ लाख १० हजार रुपयांची वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्यावर २ कोटी १३ लाख ४१ हजार २६८ रुपयांची लायबीलिटी कायम आहे.
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली मालमत्ता १० कोटी ६ लाख रुपयांची दाखवली होती, त्यावेळी २४ लाखांची लायबीलिटी असल्याचेही त्यांनी नमूद केले होते. २०१९ मध्ये होत असलेल्या या निवडणूकीत त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात एकुण १२ कोटी ७४ लाख ८७ हजार २७७ रुपयांची मालमत्ता असल्याचे नमुद केले आहे. यात सुनील तटकरे यांच्याकडे ३ कोटी ९१ लाख ७ लाख ५७३ रुपये जंगम संपत्ती असून,४ कोटी ३० लाख २३ हजार ९३० रुपयांची स्थावर संपत्तीचा समावेश आहे.
तटकरे यांच्या पत्नी वरदा तटकरे यांच्याकडे ६४ लाख ४ हजार ७०४ रुपयांची जंगम तर ३ कोटी ८९ लाख ५१ हजार ७०४ रुपयांची स्थावर संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे. म्हणजेच गेल्या पाच वर्षात सुनील तटकरे यांच्या संपत्तीत एकुण २ कोटी ६८ लाख रुपयांची वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे.