रायगड - श्री शिवाजी स्मारक मंडळाच्या माध्यमातून किल्ले रायगडावर 8 एप्रिल रोजी साजरा होणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुण्यतिथी अभिवादन सोहळा यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आला आहे. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे यांनी दिली. तसेच रायगडवर गर्दी न करता घरीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतींना वंदन करावे असे आवाहनही आंग्रे यांनी शिवभक्तांना केले आहे.
श्री शिवाजी स्मारक मंडळाच्या माध्यमातून चैत्र शुद्ध पौर्णिमा म्हणजेच हनुमान जयंतीच्या दिवशी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळावर पुण्यतिथीला अभिवादन सोहळा गेली सव्वाशे वर्ष साजरा होत आहे. कितीही अडचणी, उन्हाळा, परिस्थितीजन्य अडथळे आले तरी आजपर्यंत हा अभिवादन समारोह विना अडथळा पार पडला आहे. मात्र, यावेळी कोरोना विषाणूच्या रुपाने देशावर मोठे संकट चालून आले आहे. हा शत्रू गर्दी असलेल्या ठिकाणी पसरत असल्याने यावर्षी किल्ले रायगडावर होणारा पुण्यतिथी अभिवादन सोहळा रद्द करण्यात आला आहे.
किल्ले रायगडावरील सोहळा रद्द केला असला तरी आपल्या घरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिववंदन करून अभिवादन करावे. त्या दिवशी शिवचरित्रातील विविध पैलूंवर कुटूंबात चर्चा करावी. घरातील लहान मुलांना शिवाजी महाराज यांच्या कथा सांगाव्यात. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महाराजांच्या चरित्रातील प्रसंगावर सादरीकरण करावे आपल्याला योग्य भासेल अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा अभ्यास करावा तो ही घरात बसूनच, असे आवाहनही रघुजीराजे आंग्रे यांनी यावेळी केले.