रायगड - कोरोनाच्या या महमारीत घरी रहा सुरक्षित रहा, असे वारंवार प्रशासन सांगत आहे. तरीही अनेक नागरिक विनाकारण आणि मास्क न लावता रस्त्यावर फिरत असतात. अलिबाग पोलीस आणि नगरपरिषद याच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या कारवाईत 383 विनामस्क फिरणाऱ्या नागरिकांकडून 1 लाख 82 हजार 600 रुपये दंड आकारणी केली आहे. वाहतूक नियम उल्लंघन करणाऱ्या 4 हजार 388 जणाकडून अलिबाग पोलिसांनी 16 लाख 22 हजार 900 रुपये दंड आकारणी केली आहे. कलाम 188 प्रमाणे 22 अदखलपात्र तर 10 दखलपात्र गुन्हे अलिबाग पोलीस ठाण्यात दाखल केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक के.डी.कोल्हे यांनी दिली आहे.
अलिबागेत अजूनही आटोक्यात नाही कोरोना
अलिबाग तालुक्यात दुसऱ्या आलेल्या कोरोनाच्या लाटेत पाच हजारहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. मार्च ते मे या तीन महिन्यात साधारण दोनशेहून अधिक नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्य स्थितीत 1 हजार 49 नागरिक कोरोनाचे उपचार घेत आहेत. अजूनही रोज तालुक्यात शंभरहून अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. मात्र, असे असले तरी नागरिक कोरोनाच्या नियमाचे उल्लंघन करताना दिसत आहेत.
अलिबाग पोलिसांकडून लाखोंचा दंड वसूल
अलिबाग तालुक्यात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य प्रशासन प्रयत्न करत आहेत. तर पोलीस प्रशासन आणि अलिबाग नगरपरिषदकडूनही विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उचलला जात आहे. 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान अलिबाग पोलिसांनी नगरपरिषदेच्या साहाय्याने बसस्थानक, बायपास, गोंधळपाडा या ठिकाणी तपासणी नाका तैनात केले आहेत. पोलिसांनी आणि नगरपरिषदेने या दोन महिन्यात विनामस्क फिरणाऱ्या 383 जणांवर कारवाई केली असून 1 लाख 82 हजार 600 रुपये दंड वसूल केला आहे. तर 4 हजार 388 जणांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले असून 16 लाख 22 हजार 900 रुपये दंड वसूल केला आहे.
हेही वाचा - वरंध घाट रस्ता 1 जूनपासून वाहतुकीसाठी होणार खुला