रायगड - पोलीस मुख्यालयातील अधिकारी विश्रामगृहामध्ये एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाने गळफास लावून घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. अलिबाग येथे 3 महिन्यांपूर्वी सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी रूजू झालेल्या प्रशांत कणेरकर (वय 50) यांनी आत्महत्या केली. त्यामुळे या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. अद्याप या आत्महत्येचे कारण कारण स्पष्ट झाले नाही.
प्रशांत कणेरकर हे 3 महिन्यापूर्वी मुंबई येथून अलिबागला अर्ज शाखेत रुजू झाले. अलिबाग येथे अर्ज शाखेत रुजू झाल्यानंतर ते रजेवर गेले होते. त्यानंतर 15 ऑगस्टला पुन्हा कामावर रुजू झाले. तर 16 ऑगस्टला पोलीस मुख्यालयातील अधिकारी विश्रामगृहात रात्री आठ वाजताच्या सुमारास त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रशांत कणेरकर यांनी आत्महत्या केल्याची माहिती कळताच अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, पोलीस उपविभागीय अधिकारी सोनाली कदम, अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पी. डी. कोल्हे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा करून कणेरकर यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.