रायगड - कोरोनाकाळात उत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यातील अकरा महिला पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचा आज गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रायगड पोलीस दलातील मुख्यालयातील पोलीस नाईक आरती मंदार राऊत यांनाही प्रशस्तीपत्रक, शिल्ड देऊन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सत्कार केला. मुंबई वांद्रे येथील ताज हॉटेल येथील विंटेज कार रॅली आयोजित कार्यक्रमात हा सोहळा पार पडला.
गरोदर महिलेला पोहोचविले सुखरूप रुग्णालयात
आरती मंदार राऊत ही जिल्हा पोलीस दलात पोलीस नाईक या पदावर काम करीत आहेत. सध्या पोलीस मुख्यालयात याठिकाणी आपले कर्तव्य बजावत आहे. 3 जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळ काळात आरती हिला श्रीवर्धन येथे ड्युटी लागली होती. मात्र वादळामुळे वाहतूक सेवा बंद असल्याने स्वतःच्या कारने आपले पती यांना सोबत घेऊन श्रीवर्धनकडे निघाली होती. तळा तालुक्यातील वाशी हवेली येथे कारनेआली असता एक गरोदर महिला दिवस भरले असताना वाहनांची वाट पाहत असलेली दिसली. मात्र वादळाने झाडे पडून रस्ते बंद असल्याने कोणतेच वाहन थांबण्यास तयार नव्हते. अशा वेळी आरती आणि त्यांचे पती यांनी या गरोदर महिलेस आपल्या कारमध्ये बसवून रस्त्यात पडलेली झाडे बाजूला करून म्हसळा येथे रुग्णालयात सुखरूप पोहोचविले. त्यामुळे तिची प्रसूती वेळेत झाली.
ईटीव्ही भारताने प्रसिद्ध केले होते वृत्त
आरती राऊत यांनी वादळात केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीची ईटीव्ही भारतने दखल घेऊन बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाने याची दखल घेतली होती. या कामगिरीबाबत तत्कालीन पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनीही तिचा सत्कार केला. अनेक सामाजिक संस्थांनीही या कार्याची दखल घेतली. आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही त्यांचा सत्कार करून सन्मानित केले.