रायगड - आरोपीच्या बहिणीकडून 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या तळोजा कारागृहातील पोलीस शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारागृहासमोरच अटक केली. हत्येच्या गुन्ह्याअंतर्गत तळोजा कारागृहात असलेल्या आरोपीला जेलर आणि पोलिसांकडून कुठल्याही प्रकारचा त्रास न होऊ देण्यासाठी प्रदीप शंकर निंबाळकर या शिपायाने लाच मागितली होती.
तक्रादार महिलेचा भाऊ तळोजा मध्यवर्ती कारागृहामध्ये हत्येच्या गुन्ह्यात बंदिस्त आहे. मागील अनेक दिवसांपासून तक्रारदार महिला भावाला भेटण्यासाठी तळोजा कारागृहात जात होती. यावेळी तिथे रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या निंबाळकर याच्यासोबत तिची ओळख झाली. यावेळी निंबाळकर याने तिच्या भावाला मारहाण न करण्यासाठी तसेच त्याला चांगल्या सोयीसुविधा देण्यासाठी, मुलाखतीच्या वेळात जास्त वेळ भेटण्यासाठी, कोर्टात ने-आण करण्याच्या तारखा सुरू ठेवण्यासाठी 50 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यापैकी पहिला हफ्ता म्हणून आरोपी 5000 घेणार होता. त्यांनतर महिलेने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
तक्रारदार महिला आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक पंचासह पोहचले आणि ठरलेल्या ठिकाणी सापळा रचला. यावेळी पाच हजार रुपयांची लाच घेताना प्रदीप निंबाळकर यांना कारागृह परीसरातुनच एसीबीने रंगेहाथ अटक केली. सकाळच्या सुमारास झालेल्या या कारवाईने तळोजा जेलमध्ये एकच खळबळ उडाली आहे.