रायगड - कोरोनामुळे उघडकीस आलेल्या एसटी पास घोटाळ्यातील आरोपी वाहक जनार्दन गंगाराम म्हात्रे, जितेंद्र जयेंद्र देशपांडे, रमेश भाऊराव पाटील या ३ आरोपींवर पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याच प्रकरणात आणखी एका महिला वाहकाला निलंबित करण्यात आले आहे. तर एका महिला लेखाकारावर (अकाउंटंट ) आरोपपत्र देण्यात आले आहे.
पेण येथील एसटी आगारात घडलेल्या लाखो रुपयांच्या एसटी पास घोटाळा प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन घडामोडी समोर येत आहेत. या प्रकरणातील आरोपींची एकूण संख्या आता ५ झाली आहे. त्यात २ महिलांचाही समावेश आहे.
पेण येथील एसटी आगारात प्रवाशांना पास देताना पासच्या ३ प्रती बनविण्यात येतात. त्यापैकी १ प्रत प्रवाशाला व दुसरी प्रत अकाउंट विभागाला तर तिसरी प्रत पेण आगार कार्यालयात ठेवण्यात येते. परंतु प्रत्यक्षात मात्र तिसरी प्रत कोरी ठेवून ती दुसऱ्याच प्रवाशांना दिली जात होती व त्या रकमेची अफरातफर करण्यात येत होती. या प्रकरणात आणखीन एक वाहक भक्ती पाटील यांच्या कारकिर्दीतही पासची प्रत कोरी भेटल्याने त्यांनाही निलंबित करण्यात आले आहे.
पेण एसटी आगारात तत्कालीन अकाउंटंट प्रेक्षा जवके यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांना आरोपपत्र देण्यात आले आहे. प्रत्यक्षात अकाउंटंट यांनी (फिजिकल ऑडिट) कागदपत्रांची प्रत्यक्ष पाहणी करणे गरजेचे होते. पेण एसटी आगारातील एकूण 15 पासचे बुक गहाळ झाले आहेत. तत्कालीन अकाउंटंट यांनी त्यावेळी या बुकांंची प्रत्यक्ष तपासणी केली असती तर घोटाळा प्रकरण यापूर्वीच उघडकीस आले असते. त्यामुळे घोटाळ्याची व्याप्ती कमी झाली असती. म्हणून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी प्रेक्षा जवके यांनाही आरोपपत्र देण्यात आले आहे.
लाखो रुपयांचा घोटाळा होऊन सुद्धा आजही पेण एसटी आगारात लेखाकार (अकाउंटंट ) जागा रिक्तच आहे. याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
एसटी पास घोटाळा प्रकरणातील सर्व ५ आरोपींंविरोधात पेण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र सदर प्रकरणी तातडीने तपास करून एसटीचे घोटाळा झालेले लाखो रुपये लवकरात लवकर परत मिळावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी केली आहे.