रायगड - देव-दानवांच्या युद्धांच्या कथा रंगवून सांगितल्या जातात. त्याचीच अनोखी परंपरा जपत महाड शहरातील नागरिक होळी खेळतात. यावेळी नागरिक होळीतील जळकी लाकडे आणि निखारे एकमेकांवर फेकण्याची परंपरा आहे. होळीच्या निमित्ताने या ठिकाणी देव-दानवाचे युद्ध खेळले जाते.
महाड शहरातील गवळ आळीमध्ये पारंपरिक पद्धतीने होळी पेटवली जाते. होळी दहन झाले, की या ठिकाणी ग्रामस्थांमधील २ गटात प्रतिकात्मक युद्ध खेळले जाते. या युद्धात होळीतील जळकी लाकडे, निखारे फेकण्याची परंपरा आहे.
महाडची ग्रामदेवी जाकमाता देवीची होळी अधुनिकता आणि अरिष्ट रुढी बंद करणारी होळी आहे. पूर्वी या ठिकाणी जीवंत कोंबडी होळीवर बांधली जात असे. आता ही जीवंत बळीची प्रथा बंद करण्यात आली आहे. गावाच्या भल्यासाठी देवीकडे गाऱ्हाणे गात, फाक म्हणत गावदेवी जाकमातेची होळी साजरी केली जाते. तर जिल्ह्यातही ठिकठिकाणी होळी पेटवून रायगडकरांनी हा सण साजरा केला.