रायगड- रामानंद सागर निर्मित रामायण ही गाजलेली ऐतिहासिक मालिका शनिवार 28 मार्चपासून पुन्हा सुरू झाली आहे. कोरोनाची लागण नागरिकांना होऊ नये, यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे रामायण ही मालिका पुन्हा सुरू करण्याचा निर्णय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आणि प्रसार भारतीने घेतल्याची घोषणा माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली होती.
रायगडमधील घराघरात रामायण मालिकेचे सूर पुन्हा घुमू लागले आहेत. सध्या देशावर कोरोना विषाणूचे संकट आले असून नागरिकांनी बाहेर पडू नये, असे आवाहन शासनाने केले आहे. त्यामुळे नागरिक घरात बसून रामायण मालिकेचा आनंद घेत आहेत.
नव्वदच्या दशकात सुरू झालेली रामायण ही मालिका पाहण्यासाठी तेव्हा नागरिक टीव्हीसमोर बसून असत. त्यावेळी रस्ते निर्मनुष्य होत होते. त्यामुळे आताही नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी ही मालिका परत एकदा सुरू करण्यात आली आहे.