रायगड - मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार पार्थ पवार यांनी आज महाड येथील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या वरद विनायकाचे दर्शन घेतले. त्यांची मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी जवळजवळ निश्चित झाली आहे. त्यादृष्टीने त्यांनी आपला दौरा सुरू केला. या दौऱ्यात ते आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते व नेत्यांना भेटणार आहेत.
पार्थ एकविरा देवीचे दर्शन घेऊन खालापूर, कर्जत येथे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना भेटणार असल्याचे पक्षाकडून जाहीर झाले आहे. मात्र एकविरा देवीचे दर्शन घेऊन पार्थ पुन्हा पिंपरी येथे गेले. त्यानंतर दुपारी महाड येथे येऊन त्यांनी वरद विनायकाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार सुरेश लाड, दत्ताजी मसुरकर, आदी कार्यकर्ते होते. महाड येथे दर्शन घेतल्यानंतर काही कार्यकर्त्यांना भेटून ते पुढील दौऱ्यास निघाले.
पार्थ पवार कर्जत खालापूर मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शेकापचे कार्यकर्ते, प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी, प्रमुख नेते यांच्याशी संवाद साधणार आहेत.