रायगड - कोरोना संकट अद्यापही कायम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य हे कोरोनाच्या विळख्यात अडकले आहे. दुसरीकडे शासनाने कोरोनाबाधित नसलेल्या भागात शाळा सुरू करण्याची परवानगी दिली असून कोरोनाबाधित क्षेत्रात मोबाईल, टीव्हीच्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षण सुरू करण्याचे संकेत शासनाने दिले आहेत. त्यामुळे पालकांची ऑनलाइन शिक्षणामुळे ओढाताण झाली असून मुलाच्या शिक्षणाच्या दृष्टीने मोबाईल खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. मात्र, सध्या बाजारात मोबाईल पुरवठाही कमी होत असून जास्तीचे भाव असलेले मोबाईल पालकांना खरेदी करावे लागत आहे. त्यामुळे या कोरोना काळात पालकांच्या खिशाला कात्री बसत आहे.
2020-21 हे शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी कोरोनामुळे अद्याप शाळा सुरू झालेल्या नाहीत. राज्य शासनाकडून टप्याटप्याने शाळा सुरू करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले आहेत. राज्यात कोरोनाची संख्याही दिवसेंदिवस वाढत असून शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना लागण होण्याची शक्यताही आहे. त्यामुळे कोरोनाबाधीत क्षेत्र सोडून शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, तर कोरोनाबाधीत क्षेत्रात ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यास सांगण्यात आले आहे. त्यादृष्टीने अनेक शाळांनी मोबाईल, लॅपटॉप, टीव्हीच्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षण सुरू केले आहे.
मोबाईल, लॅपटॉप, टीव्हीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू झाले असले तरी याचा फटका हा पालकांना बसलेला आहे. घरात दोन मोबाईल असेल तरी ते पालकांच्या गरजेचे असतात. त्यामुळे पाल्याला ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल दिल्याने पालकांचीही पंचायत होत आहे. त्यामुळे पालकांनी आता मोबाईल दुकानाकडे धाव घेतली आहे. अँड्रॉइडसारखे मोबाईल हे साधारण पाच हजारांपासून विकत मिळतात. कोरोना काळात मोबाईलची आवक घटली असल्याने कमी किंमतीचे मोबाईल बाजारात उपलब्ध नाही. त्यामुळे दहा हजारांपासून पुढील किंमतीचे मोबाईल पालकांना खरेदी करावे लागत आहेत. त्यामुळे पाल्याच्या ऑनलाइन शिक्षणासाठी पालकांना मोबाईलसह नेटपॅकचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
कोरोनामुळे आधीच लोकांचे कामधंदे बंद झाले असून घरात आर्थिक चणचण निर्माण झाली आहे. मात्र, पाल्याचे शिक्षणही महत्वाचे आहे. त्यामुळे ऐपत नसतानाही मोबाईल खरेदी करावे लागत आहेत.