पनवेल - महापालिकेतील महापौरपद आता खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे नव्या चेहऱ्याला संधी की जुन्या-जाणत्यांची लागणार वर्णी, याची उत्सुकता आहे. त्यामुळे पनवेल महापालिकेच्या महापौरपदी कोण विराजमान होणार याची चर्चा सध्या जोरात रंगली आहे.
पनवेलसह राज्यातील विविध महापालिकांच्या या महापौरपदाची मुदत 15 सप्टेंबरला संपुष्टात आली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीमुळे या पदासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे पनवेलच्या पहिल्या वहिल्या महापौर पदाचा मान पटकवणाऱ्या विद्यमान महापौर डॉ. कविता चौतमोल या पदावर कायम होत्या. परंतु, राज्यातील महापालिकांच्या महापौरपदांसाठीच्या आरक्षणासंदर्भातली लॉटरी काढण्यात आली. त्यात, खुल्या प्रवर्गातील महिला या घटकाकडे हे पद गेले आहे.
हेही वाचा - पनवेल पोलीस ठाण्याच्या हद्दीमुळे पोलीस आणि नागरिकांची गैरसोय, हद्दीत बदल करण्याची मागणी
मागच्यावेळी हे पद अनुसूचित जाती महिलासाठी आरक्षित झाले होते. त्यामुळे पनवेलमधील सत्ताधारी भाजपने डॉ. कविता चौतमोल यांना महापौर पदाच्या खुर्चीवर बसवले होते. परंतु, आता हे पद खुल्या प्रवर्गातील महिलेकडे गेल्याने नवी राजकीय समीकरणे पाहाता पनवेलमधील सत्ताधारी भाजप कोणाला संधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पनवेल महापौर पदाचे आरक्षण खुल्या वर्गातील महिलेकडे गेल्याने महापौरपदासाठी इच्छुकांनी आपले देव पाण्यात ठेवले आहेत.
हेही वाचा - 'पेण-पनवेल-दिवा' रेल्वे सेवेला १ वर्ष पूर्ण, पेणकरांकडून वर्षपुर्तीचा दिवस साजरा