खालापूर/रायगड - आषाढी एकादशीनिमित्त प्रतिवर्षी महाराष्ट्रातून लाखो वारकरी पायी पंढरपूरला जातात. ही अनेक वर्षाची प्रथा आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षी सर्वांनीच समजुतदारपणे पायी वारीचे आयोजन केले नाही. यावर्षी २० जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. यावर्षीही कोरोनामुळे पायी वारीला बंदी आहे. त्यामुळे तमाम वारकरी संप्रदायामध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. राज्य सरकारचा निषेध दर्शवण्यासाठी विश्व हिंदू परिषद व वारकरी संप्रदाय खालापूर प्रखंडने खालापूरचे तहसिलदार इरेश चप्पलवार यांना निवेदन देत राज्य सरकारचा निषेध केला आहे. तसेच, वारकऱ्यांच्या भावना राज्य सरकारकडे पोहोचवण्याची निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
पायी वारीला बंदी, वारकरी संतप्त
यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे सर्व नियम पाळून वारकऱ्यांनी पायी वारी काढण्याचा निर्णय घेतला. पण सरकारने यावर्षी पायी वारीवर बंदी घातली आहे. तसेच, ज्येष्ठ किर्तनकार ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनाही अटक केली. शिवाय, वारकऱ्यांची जागोजागी अडवणूक केली जात आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायामधून नाराजी व्यक्त होत आहे.
टाळ-मृदुंगाच्या गजरात निषेध
संविधानाने नागरिकांना दिलेला उपासना करण्याचा अधिकार व मूलभूत स्वातंत्र्य यांना कोणी अडवू शकत नाही. या धोरणाविरूद्ध विश्व हिंदू परिषद, बजरंगदल व वारकारी संप्रदाय यांच्यावतीने सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. खालापुरातही निषेध व्यक्त करण्यात आला. विश्व हिंदू परिषद व वारकरी संप्रदाय खालापूर प्रखंडने खालापूरचे तहसिलदार इरेश चप्पलवार यांना निवेदन देत, राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला.
नागपुरातही भजन आंदोलन
तर, नागपुरात विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वात वारकऱ्यांनी भजन आंदोलन केले. पायीवारी करू द्यायला सरकार परवानगी देत नसल्याच्या निषेधार्थ आज नागपूरच्या संविधान चौकात विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वात वारकऱ्यांनी भजन आंदोलन केले. यावेळी वारकऱ्यांनी भजने गाऊन सरकारचा निषेध नोंदवत रिंगण घातले होते.
काय आहेत वारकऱ्यांच्या मागण्या?
- राज्यातील सर्व मंदिरे, देवस्थाने, मठ येथे नियमांची मर्यादा ठेवून त्वरित उघडण्यास परवानगी देण्यात यावी.
- 750 वर्षांची पायी वारीची परंपरा तसेच यावर्षी तुकाराम महाराजांच्या 360 व्या पालखी सोहळ्याला परवानगी देण्यात यावी.
- निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम अशा मानाच्या 10 पालख्यांसोबत किमान 350 ते 400 पालख्या पंढरपुरात दाखल होतात. म्हणून प्रत्येक पालखीसोबत किमान तीन ते चार वारकऱ्यांना वारी करू द्यावी. तर मानाच्या प्रत्येक पालखीसोबत 50 लोकांना वारीची परवानगी देण्यात यावी.
- ज्या वारकऱ्यांचे दोन्ही डोस पूर्ण झालेले आहेत अशाच लोकांना पायी वारी करण्याची परवानगी देण्यात यावी.
- ज्या ठिकाणी संक्रमणाचा धोका असेल त्या ठिकाणी वारकरी गावाबाहेर माळरानात मुक्काम करतील.
- ज्येष्ठ सप्तमी ते एकादशी अशी 20 दिवसांची वारी केवळ 10 दिवसात पूर्ण करतील.
- एकादशीनंतर 15 दिवस 10 ते 20 वारकऱ्यांना पांडुरंगाचे दर्शन करू द्यावे.
आणखी एक मागणी
तसेच, शासन वारकऱ्यांना अटक करत असेल आणि पंढरीमध्ये येऊ देत नसेल, तर ते नैतिकदृष्ट्या योग्य नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सर्व वारकऱ्यांना एकत्र घेऊन महापूजा करावी', अशीही मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे.
फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
आषाढी पायवारीसाठी 'बायो-बबल' पद्धतीचा अवलंब करत काही निवडक वारकर्यांना परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी 10 जून 2021 रोजी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते.
19 जुलैला निवृत्ती महाराजांची जाणार पंढरीला
संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचा प्रस्थान सोहळा पौर्णिमेच्या मुहूर्तावर 24 जूनला पार पडला. त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे नाथ महाराजांच्या पालखीने प्रातिनिधिक स्वरुपात प्रस्थान केले. 19 जुलैपर्यंत ही पालखी येथेच असणार आहे. 19 जुलैला पालखी शासनाच्या नियमानुसार दोन बसमधून पंढरपूरला जाणार आहे. यावेळी पालखीसोबत ठराविकच वारकरी असणार आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे वेळापत्रक
- प्रस्थान सोहळा - २ जुलै रोजी पार पडला.
- पहाटे ४ ते ५.३० : घंटानाद, काकडा, पवमान अभिषेक, पंचामृत पूजा, दुधारती झाली.
- सकाळी ९ ते ११ : वीणा मंडपात कीर्तन झाले.
- दुपारी १२ ते १२.३० : गाभारा स्वच्छ करणे, समाधीस पाणी घालणे व महानैवेद्य झाला.
- सायंकाळी ४ वाजता प्रस्थान सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रम पार पडला.
- सायंकाळी ६ वाजता माऊलींची पालखी मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून आजोळघरी मुक्कामी गेली.
- ३ ते १९ जुलैपर्यंत आजोळघरीच माऊलींच्या पादुकांवर परंपरेनुसार सर्व नैमित्तिक उपचार होणार.
- १९ जुलैला माऊलींच्या चलपादुका सकाळी १० वाजता एसटी बसने पंढरपूरकडे मार्गस्थ होणार.
- १९ ते २४ जुलै : माऊलींच्या पादुका पंढरपूरमध्ये मुक्कामी असणार.
- २४ जुलै : पौर्णिमेला काला समाप्तीनंतर पंढरपूरहून आळंदीकडे एसटी बसने परतीचा प्रवास.
संत तुकाराम महारांच्या पालखीचे वेळापत्रक
1 जुलै 2021 रोजी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा पार पडला. दुपारी 2 वाजता पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. दरम्यान, 19 जुलै रोजी सकाळी 9 वाजता महाराजांच्या पादुका बसने पंढरपूरकडे रवाना होतील. 19 जुलै ते 24 जुलैपर्यंत पादुका पंढरपूरमध्ये राहतील. 24 जुलै ते 4 ऑगस्टपर्यंत पालखी पुन्हा मुख्य मंदिरात राहील.
मनाने प्रत्येक वारकरी वारीत असणार
गत वर्षी प्रत्येक पालखी सोहळ्याला एक एसटी बस देण्यात आली होती. मात्र, यंदा त्या दोन एसटी बस देण्यात येणार आहेत, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. त्यामुळे यंदाही लाखो वारकरी पंढरीला जाऊ शकणार नाहीत. मात्र, मनाने प्रत्येक वारकरी हा वारीतच असणार आहे.
पायी वारीचा आनंदच वेगळा - रघुनाथ बुवा गोसावी
'आषाढी वारी सोहळा यंदाच्या वर्षीही कोरोनाच्या सावटाखालीच साजरा होणार आहे. यंदा वारीसाठी केवळ १० पालख्यांनाच बसने जाण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र, पायी जाण्याचा आनंद वेगळाच असतो. त्याला आम्हाला दोन वर्षापासून मुकावे लागत आहे', अशी खंत शांतिब्रह्म एकनाथ महाराजांचे प्रमुख रघुनाथ बुवा गोसावी पालखीवाले यांनी व्यक्त केली आहे.
पायी वारी सोहळ्यावर आलेली नैसर्गिक आणि सुल्तानी संकटं
इ.स. 1396, 1630, 1876, 1896, 1923 आणि 1972 या काळात वारीवर दुष्काळाचे सावट राहिले. वारीच्या काळात लोकांना अन्नधान्य खायाला मिळाले नाही. इ. स. 1656, 1677, 1695 व 1699 मध्ये वारीवर सुलतानी संकटे आली. वारीवर निघालेल्या वारकऱ्यांवर व दिंड्यांवर विजापूरचा बादशहा आदिलशहाचा सेनापती अफजलखान, मोगल सेनापती बहादूर खान व औरंगजेब बादशहाच्या सैन्यांनी आक्रमणे केली. त्यावेळी छत्रपती शाहू महाराज व राजाराम महाराजांनी सुरक्षेसाठी आपले सैन्य देऊन वारकऱ्यांचे संरक्षण केले होते. सन 1875 ते 1895 या 20 वर्षांत राज्यात कॉलराची साथ होती. हजारो लोक या साथीला बळी पडले. वारीच्या काळात पंढरपूर शहर रिकामे केले जायचे. पण, पंढरीची वारी कधी चुकली नाही.
चंद्रभागेला महापूर
सन 1898, 1943 व 1956 ला चंद्रभागेला महापूर आला होता. संपूर्ण पंढरपूर शहराला पुराच्या पाण्याने विळखा घातला होता. त्याकाळात संतांच्या पालख्या वाखरीला थांबविण्यात आल्या होत्या. फक्त मानकरी पालख्यांच्या पादुका होडीतून पांडुरंगाच्या भेटीला नेण्यात आल्या होत्या. आजही वाखरीतच माऊलीचा रथ थांबवला जातो. वाखरीचा ओढा पार करुन माऊलींची पालखी भाटेंच्या रथात ठेवली जाते. तर इसबावीपासून पादुका गळ्यात घालून नेल्या जातात. ही परंपरा आजही जोपासली जात आहे.
प्लेगच्या साथीचे संकट
सन 1873, 1893, 1899, 1905, 1910, 1925, 1944 व 1946 मध्ये राज्यात प्लेगची साथ आली होती. त्यावेळीही पंढरपूर शहर रिकामे करण्यात आले होते. फक्त संतांच्या पादुका विठुरायाच्या भेटीला आणण्यात आल्या होत्या. मागील इतिहास पाहिला तर अनेक मोठी संकटे वारीवर आली. जागतिक महायुद्धात म्हणजे 1944 व 45 ला वारीवर बंदी घालण्यात आली होती. बंदी असतानाही वारकऱ्यांनी पंढरीची वारी कधी चुकू दिली नाही.
हेही वाचा - इम्रान खान वर विश्वास ठेऊ नये- संजय राऊत