रायगड - निसर्ग चक्रीवादळात वाडवडिलांचे बांधलेले घर जमीनदोस्त झाले. घराच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामेही प्रशासनाकडून करण्यात आले. शासनाकडून मदतही मिळाली. मात्र, घराच्या नुकसानीचे पंचनामे चुकीचे करून शासनाने दिलेली नुकसान भरपाई मदतही चुकीच्या पद्धतीने दिल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी अलिबाग येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केला. प्रशासनाच्यामार्फत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करूनच आम्हाला भरपाई देण्यात आली असून विरोधी पक्षनेत्यांनी केलेले आरोप हे खोटे असल्याचे नागाव ग्रामपंचायत हद्दीतील नुकसानग्रस्त एम. एन. पाटील आणि संजय हजारे यांनी ईटीव्ही भारतसोबत बोलताना प्रतिक्रिया दिली.
नागाव गावातील एम. एन. पाटील आणि संजय हजारे याच्याही घरांचे वादळात नुकसान झाले. त्याचे पंचनामे होऊन नुकसानीचे एम. एन. पाटील यांना 1 लाख 40 हजार तर संजय हजारे यांना 1 लाख 60 हजारचो नुकसान भरपाईही प्रशासनाने दिली. नागाव येथील निसर्ग चक्रीवादळाने बाधित एम. एन. पाटील आणि संजय हजारे यांना दिलेली नुकसान भरपाई ही चुकीच्या पद्धतीने दिली गेल्याचा आरोप अलिबाग येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला होता.त्याबाबत एम. एन. पाटील आणि संजय हजारे यांनी आपले म्हणणे ईटीव्ही भारतच्या माध्यमातून मांडले आहे.
हेही वाचा - देशातील कोरोना रुग्ण संख्येने 7 लाखांचा टप्पा ओलांडला; गेल्या 24 तासात 22 हजार रुग्णांची भर
मागील महिन्यात दिनांक 3 जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात होत्याचे नव्हते केले. लाखो घरांचे तसेच बागायतीचे नुकसान झाले. अलिबाग तालुक्यातील नागाव गावालाही या वादळाचा चांगलाच फटका बसला. अनेकांचे संसार हे उध्वस्त झाले, तर बागायती कोलमडून पडल्या. वादळानंतर प्रशासनाकडून तातडीने नुकसानीचे पंचनामेही करण्यात आले. शासनाकडून मदतही आली. त्यानंतर झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाईही वाटण्यास सुरुवात झाली.
प्रशासनाच्या माध्यमातून नुकसानग्रस्त नागरिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले, असून त्यानुसार नुकसान भरपाई प्रशासनाकडून वाटप सुरू झाले आहे. मात्र, विरोधी पक्षनेत्यांनी पत्रकार परिषदेत केलेले आरोप हे चुकीचे असून कोणालाही चुकीच्या पद्धतीने नुकसान भरपाई दिली गेली नसल्याचे ग्रामपंचायत सदस्या हर्षदा मयेकर यांनी म्हटले आहे.