रायगड - कोरोना प्रादुर्भाव अद्यापही सुरूच असल्याने विद्यार्थ्यांचे यावर्षीचे शैक्षणिक वर्ष ऑनलाईन सुरू राहणार आहे. आजपासून काही शाळा, कॉलेजचे ऑनलाईन वर्ग सुरू झाले असून उद्यापासून जिल्ह्यातील सर्व शाळांचे वर्ग सुरू होणार आहेत. ऑनलाईन वर्ग सुरू होणार असल्याने शाळांनी नवीन मोबाईल अॅप तयार केले असून गुगल मीटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू झाले आहे. त्यामुळे, प्रत्यक्षात विद्यार्थ्यांसाठी शाळेतील घंटा वाजली नसली तरी ऑनलाईन घंटा आजपासून वाजली आहे.
हेही वाचा - पर्यटकांना थांबवण्यासाठी प्रशासनाने उभारले चेक पोस्ट
शाळा कोरोनामुळे बंदच
मार्च 2020 पासून कोरोना महामारी सुरू झाली. त्यानंतर शासनाने लॉकडाऊन जाहीर केले. सर्व व्यवहारासह शाळा, कॉलेजही बंद करण्यात आले. त्यामुळे, 2020/21 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे शिक्षण हे ऑनलाईन सुरू झाले. तर, परीक्षाही ऑनलाईन घेण्यात आल्या. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शैक्षणिक वर्षाच्या मध्यंतरी पाचवी ते बारावी आणि कॉलेज सुरू करण्यात आले होते. मात्र, पुन्हा कोरोना प्रादुर्भाव वाढला आणि पुन्हा ऑनलाईन शिक्षण सुरू झाले.
ऑनलाईन शिक्षण सुरू
2021/22 या वर्षातील शैक्षणिक वर्ष जूनपासून सुरू झाले आहे. मात्र, कोरोना प्रादुर्भाव हा अद्याप कमी झालेला नाही. त्यातच कोरोनाची तिसरी लाट ही मुलांसाठी घातक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे, यावर्षीही ऑनलाईन शिक्षणच सुरू झाले आहे. 14 जूनपासून शाळा सुरू झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांसाठी घरूनच अभ्यास सुरू करण्यात आलेला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळानी ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे. यासाठी नविन अॅप तयार करण्यात आले असून गुगल मीट, झूमच्या माध्यमातून आता विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू झाले आहे. त्यामुळे, आता विद्यार्थी घरातच बसून ऑनलाईन शिक्षण घेत आहेत.
आजपासून शाळांची वाजली ऑनलाईन घंटा
रायगड जिल्ह्यातील शाळांनी ऑनलाईन तयारी करून आजपासून ऑनलाईन वर्ग सुरू केले आहेत. खासगी शैक्षणिक संस्थांनी शाळा सुरू होण्यापूर्वी पालकांची नावे त्यांचे मोबाईल नंबर, ई-मेल आयडी अशी माहिती गोळा करून आजपासून गुगल मीट आणी झूम ॲपचा वापर करून शिक्षण देण्यास सुरवात केली आहे. यामध्ये कोकण एज्युकेशन सोसायटी, गुरुकुल अकॅडमी, सेंट जेव्हीअर्स, समर्थ विद्यालय, सेंट मेरी कॉन्व्हेंट, डीकेटी, जिल्हा परिषद शाळा, सरकारी शाळा आणी ईतर खासगी शैक्षणिक संस्था यांचे ऑनलाईन वर्ग भरवण्यात आले आहेत. कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी जिल्ह्यातील शाळांची ऑनलाईन घंटा आजपासून वाजली आहे.
हेही वाचा - रायगड : खालापुरात शेतकऱ्यांना यंत्राद्वारे भात लागवडी करिता मार्गदर्शन