महाड (रायगड) : तालुक्यातील बावले या गावामधील विलगीकरण केंद्रावर झाड कोसळल्याने एका वृद्धेचा मृत्यू झाला आहे. जानकीबाई डेरे असे या वृद्ध महिलेचे नाव आहे. याप्रकरणी ग्रामसमितीविरोधात महाड प्रांताधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
जानकीबाई डेरे या १० दिवसांपूर्वी मुंबईहून परतल्या होत्या. त्यामुळे, त्यांना विलगीकरण केंद्रामध्ये ठेवण्यात आले होते. ३ जूनला येणाऱ्या निसर्ग चक्रीवादळाचा धोका लक्षात घेत, जानकीबाईंच्या नातेवाईकांनी त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची मागणी ग्रामसमितीला केली होती. मात्र, ग्रामसमितीने याकडे दुर्लक्ष केले अशी माहिती त्यांच्या मुलाने दिली.
चक्रीवादळाचा फटका बसल्यामुळे या विलगीकरण केंद्रावर झाड कोसळले, त्यात जानकीबाई जखमी झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूला ग्रामसमिती जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या मुलाने केला आहे.
हेही वाचा : पोलिसांच्या भीतीपोटी मार्ग बदलला... पायी येणाऱ्या चाकरमान्यावर काळाचा घाला