रायगड - जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील बोरघाटात टँकरमधून ऑइल गळती झाली आहे. त्यामुळे या भागात अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच आपातकालीन टीम व आर आर बी यंत्रणेने घटनास्थळी धाव घेऊन पुढील अपघात टाळण्यासाठी कार्य हाती घेतले. यावेळी त्यांनी रस्त्यावर सांडलेल्या ऑइलवर माती टाकण्याचे काम सुरू केले आहे.
मुंबई पुणे जुन्या महामार्गावर पुणेकडे जाणाऱ्या ऑइल टँकरच्या टाकीतून ऑइल गळती झाली आहे. ही ऑइल गळती खोपोली पासून खंडाळाकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यत झाली आहे.
टँकरमधून पडलेले हे ऑइल खोपोली ते खंडाळा एक्झिटपर्यंत सांडले आहे. त्यामुळे वाहनांना सावकाश जाण्याच्या सूचनाही 'आरआरबी'कडून देण्यात आलेल्या आहेत. सदरची घटना ही दुपारी एक ते दीडच्या दरम्यान घडली होती. ऑइल गळती ही सात ते आठ किलोमीटरपर्यंत झाली असल्याने माती टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या ऑइल गळतीमुळे वाहन घसरून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला होता.