रायगड - जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या ठिकाणीच उत्तम, सुसज्ज असे परिचारिका महाविद्यालय व्हावे, या दृष्टीने २०१३ मध्ये शासनाने नव्या इमारतीसाठी मंजुरी दिली होती. त्यानंतर इमारतीच्या कामाला सुरुवात झाली. मात्र, सहा वर्षानंतरही परिचारिका महाविद्यालयाचे काम अजूनही अपूर्णच राहिलेले आहे. त्यामुळे परिचारिका शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची कुचंबणा झाली आहे. या इमारतीसाठी आत्तापर्यंत १ कोटी २५ लाख रुपयांचा निधी खर्च झाला आहे, असे असताना आता इमारतीचे बांधकाम होणार तरी कधी, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परिचारिका अभ्यासक्रम शिकता यावा यासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात नर्सिंग अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. जिल्हा रुग्णालयात शासनामार्फत परिचारिका अभ्यासक्रम चालविला जातो. दरवर्षी ४० ते ५० विद्यार्थी अभ्यासक्रमासाठी नोंदणी करतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हा रुग्णालय परिसरात वास्तव्याची सोय उपलब्ध करून दिली जात असते. त्यामुळे नर्सिंग कॉलेजच्या प्रशिक्षणासाठी जिल्हा रुग्णालयाच्या आवारात सुसज्ज इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी २ कोटी ५१ लाख रुपयाचा निधी मंजुर करण्यात आला. ऑगस्ट २०१३ मध्ये या कामाला प्रशासकीय मंजुरी आणि तांत्रिक मान्यता देण्यात आली.
हेही वाचा - रायगड: आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला वाहतूक पोलिसांमुळे जिवदान
सदर काम दोन वर्षात पुर्ण करणे अपेक्षित होते. सुप्रभात कन्स्ट्रक्शन कंपनीला या कामाचा ठेका देण्यात आला. मात्र, काम सुरू होऊन सहा वर्ष लोटली तरी परिचारिका महाविद्यालयाच्या इमारतीचे काम पुर्ण झालेले नाही. स्थानिक आमदारांच्या कंपनीकडे ठेका असल्याने बांधकाम विभागाचे अधिकारी बोलायला तयार नाहीत. सुरुवातीला नर्सिंग कॉलेजसाठी तळ मजला आणि दोन मजले, अशी या इमारतीची रचना होती. मात्र, प्रत्यक्षात इमारत बांधताना तळ मजला आणि एक माळा, अशी इमारत बांधण्यात आली. ठेकेदार कंपनीला या कामासाठी आत्ता पर्यंत १ कोटी २५ लाख ५१ हजार रुपयांचा निधी देण्यात आला. मात्र, इमारतीचे बांधकाम काम काही मार्गी लागलेले नाही.
हेही वाचा - अलिबाग मतदार संघात 4 नवीन मतदान केंद्र: 375 मतदान केंद्रांवर होणार मतदान
सिंधुदुर्ग येथील महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण
सिंधुदुर्ग व रायगड या जिल्ह्यात एकाच वेळी परिचारिका महाविद्यालयाच्या नव्या इमारतीस मंजुरी देण्यात आली होती. सिंधुदुर्ग येथील महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, रायगडमध्ये स्थानिक आमदार यांच्या कंपनीने घेतलेले काम अद्यापही अपूर्णच ठेवले असल्याने हे काम नक्की कधी पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
हेही वाचा - उरणच्या ओएनजीसीमध्ये पुन्हा एकदा वायुगळती; ग्रामस्थ चिंतेत
इमारतीचे बांधकाम तातडीने पुर्ण करावे, अशा सुचना वेळोवेळी ठेकेदारांना देण्यात येत आहेत. काम लवकरच पुर्ण होईल अशी अपेक्षा आहे, असे अलिबागचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता मधुकर चव्हाण यांनी सांगितले.