पनवेल - गाढी नदीचे पुनरुज्जीवन व सौंदर्यीकरण करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र दिनाच्या पर्वावर निसर्गमित्र संस्थेने लोकसहभागातून गाढी नदी स्वच्छता मोहीम राबविली. प्रशासनाकडे बोट दाखवण्यापेक्षा आपण सुजान नागरिक म्हणून आपल्याला शक्य असेल त्याप्रमाणे निसर्ग संवर्धनाचे काम केले पाहिजे, या हेतूने केलले निसर्गमित्र संस्थेचे हे काम खरोखरच प्रशंसनीय आहे.
पनवेल शहराच्या पूर्वेला माथेरान डोंगरातून उगम पावून शहराला अगदी चिकटून असलेल्या खाडीत गाढी नदी संपते. सुमारे १५ किलोमीटरच्या या नदीचा बराचसा भाग पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात येतो. परंतु ठिकठिकाणी नदीत टाकत असलेल्या कचऱ्यामुळे गाढी नदीची दुरवस्था झाली आहे. यामध्ये प्लास्टिकच्या कचऱ्यासह रूग्णालयातील वेस्टेज, दारूच्या बाटल्या, बॅनर्स, लग्नपत्रिका, निर्माल्य, टोपल्या यांसारख्या विविध प्रकारच्या कचऱ्याने गाढी नदीला अक्षरशः कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
त्यामुळे निसर्ग मित्र संस्थेच्या सदस्यांनी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात साठलेला हा कचरा उचलून नदीची स्वच्छता केली. निसर्गमित्र ही संस्था गेली ३२ वर्ष निसर्ग शिक्षण, निसर्ग संवर्धन, गिर्यारोहण, साहस अशा अनेक पातळीवर कार्य करीत आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त गाढी नदीच्या स्वच्छतेसाठी घेतलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल संस्थेचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
यावेळी सचिन शिंदे, धनंजय मदन, किशोर म्हात्रे , सुरेश रिसबुड, आबा गोडबोले, कुमार ठाकूर, नितीन कानिटकर, चारुलता मदन, मेधा रिसबुड, गायत्री बोईड, ज्योती कानिटकर, ऐश्वर्या पवार, गौरी बोईड, प्राजक्ता, नाजुका, त्रिवेणी पाटील, शिल्पा, शामल, रवी, पराग, अक्षय, विश्वेश, निलेश, आकाश, डॉ. आशीष ठाकूर, डॉ. मानस ठाकूर, सुरेश घाडगे, विशाल, अक्षय, हर्षल, शहा, दीक्षित असे अनेकजण या उपक्रमात सहभागी झाले होते.