रायगड - 22 जुलैरोजी महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून 32 कुटूंब दरडी खाली गाढली गेली होती. चार दिवस सुरू असलेले हे बचावकार्य आज 26 जुलैरोजी नातेवाईकांच्या सांगण्यावरून थांबविण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे. या शोधकार्यादरम्यान, 53 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून उर्वरित 31 जणांचे मृतदेह न सापडल्यामुळे त्यांना मृत घोषित केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
84 ग्रामस्थ दरडीखाली गाढले गेले होते -
22 जुलै रोजी अतिवृष्टीने महाड तालुक्यातील तळीये गावाचा डोंगर साडेचार वाजण्याच्या सुमारास कोसळून 32 कुटूंब गाढली गेली. मुसळधार पाऊस आणि पूरस्थिती अनेक भागात पडलेल्या दरडी यामुळे प्रशासन वेळेत पोहचले नसल्याने स्थानिकांनी 32 मृतदेह बाहेर काढले होते. त्यानंतर 23 जुलै रोजी एक वाजेपर्यंत एनडीआरएफ पथक दाखल झाल्यानंतर शोधकार्याला गती आली. या दुर्घटनेत तळीये गावातील 84 ग्रामस्थ दरडीखाली गाढले गेले होते. चार दिवस सुरू असलेल्या शोधकार्यात 53 जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असून 31 जण अजूनही बेपत्ता होते.
...म्हणून शोधकार्य थांबवले -
दुर्घटना होऊन चार दिवस झाल्याने गाढलेल्या ग्रामस्थांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली होती. एनडीआरएफ आणि टीडीआरएफ पथकाकडून शोध कार्य सुरू असताना अनेकांच्या मृतदेहाचे तुकडे हाती लागत होते. जेसीबीच्या मदतीनेही मातीचा मलबा काढत असताना मृतदेहाचे अवयव येत होते. अखेर नातेवाईकांनी आता शोध कार्य थांबवा, मृतदेहाची विटंबना नको, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार नातेवाईक, स्थानिक, आमदार आणि प्रशासन यांची बैठक घेऊन आज 26 जुलैपासून तळीये येथील शोधकार्य थांबविण्यात आले. तसेच मृत घोषित केलेल्या नातेवाईकांकडून जिल्हा प्रशासनाने हमीपत्र घेतले असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले. तर एनडीआरएफनेही शोध कार्य थांबवत असल्याचे म्हटले आहे.