रायगड - अलिबाग तालुका हा सध्या कोरोनाच्या विळख्यात अडकला आहे. तालुक्यातील नवेदर नवगाव हे गाव कोरोनाचा हॉटस्पॉट ठरले आहे. नवेदर नवगाव हे गाव कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे या गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सद्यस्थितीत या गावात पावनेदोनशे ग्रामस्थ कोरोनाबाधित आहेत. प्रशासनाकडून नागरिकांच्या कोरोना चाचण्यांना सुरुवात करण्यात आली आहे. गावात कोरोनाबाधितांची संख्या अधिक असल्याने बाहेरील नागरिकांना गावात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
गावात पावणेदोनशे जणांना कोरोनाची लागण
नवेदर नवगाव या गावात महिनाभरापूर्वी कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाली. मात्र आठवडाभरापूर्वी गावातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. गावात अंदाजे साडेतीन हजारांच्या आसपास लोकवस्ती आहे. यापैकी बाराशे जणांची अँटीजन तपासणी करण्यात आली असून, यापैकी 175 ग्रामस्थ हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सध्या त्यांंच्यावर उपचार सुरू आहेत.
प्रशासनाकडून कोरोना प्रतिबंधक उपाययोजना
नवेदर नवगाव गावात वाढत आलेल्या कोरोना रुग्ण संख्येमुळे प्रशासनाने खबरदारीची पावले उचलली आहेत. गावातील लहानांपासून मोठ्या व्यक्तीची कोरोना चाचणी आरोग्य विभागाकडून केली जात आहे. गावात जंतुनाशक फवारणी केली जात आहे. कोरोना लागण झालेल्या रुग्णांसाठी विलगिकरण कक्ष गावात स्थापन करण्यात आले आहेत. प्रशासनाकडून गावातील कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशी माहिती डॉ. कैलाश चौलकर यांनी दिली आहे.
पोलीस बंदोबस्तात वाढ
ज्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, अशांपैकी काही नागरिक हे गावात फिरत असल्यामुळे त्यांच्यामुळे इतर लोकांना देखील कोरोनाची लागण होत आहे. अशा पद्धतीने कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी अलिबाग पोलिसांनी गावात चोख बंदोबस्त तैनात केला आहे. ध्वनिक्षेपणाद्वारे पोलिसांकडून गावात जनजागृती करण्यात येत आहे. बाहेरील नागरिकांना गावात येण्यास मनाई करण्यात आली आहे.
ग्रामस्थांकडून सहकार्याची अपेक्षा
गावात वाढत असलेला कोरोना रोखण्यासाठी प्रशासन योग्य पद्धतीने काम करीत आहे. लोकप्रतिनिधी देखील गावात येऊन जनजागृती करत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळावेत, प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या गटनेत्या मानसी दळवी यांनी ग्रामस्थांना केले आहे.
हेही वाचा - काका-पुतण्यासमोर काँग्रेस नेत्यांना किंमत नाही - पडळकर