पनवेल - वादग्रस्त नागरिकत्व कायद्यात दुरुस्तीची अंमलबजावणी करण्यावरून केंद्र सरकार विरूद्ध काही राज्यांमध्ये हिंसक आंदोलन होत आहे. याचे पडसाद पनवेलमध्ये ही दिसुन आले. पनवेलमध्ये मुस्लिम समाजाने भव्य मोर्चा काढून नागिरकत्व सुधारणा कायद्याला विरोध दर्शवला. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी विरोधात काढण्यात आलेल्या या मोर्चात अनेक मुस्लिम हातात झेंडा घेऊन घोषनाबाजी करताना दिसून आले.
हेही वाचा - रायगडात 5 तोळे सोन्याची चोरी; आरोपी 72 तासांत जेरबंद
यावेळी मोर्चात केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देत, कोणत्याही परिस्थितीत हा कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली. नागरिकत्व कायदा दुरुस्तीच्या नावाने, धर्माच्या आधारावर विभाजन करण्याचा आणि मूळ समस्यांवरून जनतेचे लक्ष हटवण्याचा केंद्राचा डाव असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्व जातीधर्माच्या लोकांनी बलिदान दिले आहे. हा देश सर्वाचा आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या निमित्ताने भाजप सरकारने धार्मिक विभाजन करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा आरोप देखील यावेळी आंदोलकांनी केला.
पनवेल शहरातील जामा मशीदमधून या मोर्चाला सुरवात करण्यात आली. नही चलेगी नही चलेगी, तानाशाही नही चलेगी’ च्या घोषणा देत आणि अखंड भारताचा नारा देत मोर्चात सहभागी झालेल्या हजारो मुस्लिम बांधवांनी केंद्र सरकारच्या कृतीला विरोध केला.
हेही वाचा - रायगड जिल्ह्यातील कोटयवधींचा डिझेल परतावा रखडला, मच्छिमार बांधव मेटाकुटीला
हा मोर्चा शांततेत पार पडल्याने पोलिस व शहरवासियांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मोर्चासाठी पोलिस मोठ्या संख्येने तळ ठोकून होते. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे निरीक्षक व पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. शहरातील सर्व प्रमुख मार्गावरुन फिरुन अखेरीस पनवेल महापालिका कार्यालयाच्या मैदानात सांगता करताना मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी विविध वक्त्यांची भाषणे झाली.