रायगड- टाळेबंदीमुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक कोंडी झाली असताना आता महावितरण कंपनीने एकदाच ५ महिन्याचे वीजबिल देऊन ग्राहकांना शॉक दिला आहे. ५ महिन्याचे एकाचवेळी भरमसाठ बिल आल्याने ग्राहक संतापले असून तक्रारीसाठी महावितरण कार्यलयाबाहेर ग्राहकांची रांग लागल्याचे पाहायला मिळत आहे.
मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने शासनाने टाळेबंदी जाहीर केली. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले. हाती काम नसल्याने अनेकांना घरी बसावे लागले, त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागले. कोरोना प्रादुर्भाव असल्याने महावितरण कंपनीनेही ग्राहकांचे मीटर रीडिंग घेतले नाही. त्यामुळे, नागरिकांना बिले देण्यात आली नाही. तर, महावितरणकडून ऑनलाइन माध्यमातून अंदाजित बिले ग्राहकांना पाठविण्यात आली. त्यामुळे, ही वीजबिले कमी दराची आली. मात्र, त्यानंतर महावितरणने एप्रिल ते ऑगस्ट अशी ५ महिन्याची भरमसाठ बिले ग्राहकांना पाठवली. ही वीजबिले पाहून ग्राहक संतापले व त्यांनी महावितरण कार्यलय गाठले.
याप्रकरणी ग्राहकांना ५ महिन्याची सरासरी मीटर रीडींग काढून वीजबिले पाठवली असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे, महावितरणच्या या सावळ्या गोंधळामुळे ग्राहकांना चांगलाच आर्थिक शॉक बसला आहे. तक्रारीसाठी महावितरण कार्यलयाबाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्या असून कर्मचारी आणि ग्राहक यांच्यात वादाचे प्रसंग निर्माण झाले आहेत.
कोरोना काळात घरोघरी जाऊन रीडींग घेण्यास बंदी होती. त्यामुळे, एप्रिल ते जून महिन्यात अंदाजीत वीजबिले दिली होती. ऑगस्ट महिन्यात रीडींग घेऊन ती एप्रिल ते ऑगस्ट, अशी ५ महिन्याची बिले योग्य पद्धतीने ग्राहकांना दिली आहेत. काही ग्राहकांची बिलांबाबत शंका आहेत. बिले ही पाच महिन्याची एकदम आली असल्याने ती जास्तीची वाटत आहेत. ज्या ग्राहकांना आलेली वीजबिले एकाचवेळी भरता येत नसतील त्यांना ३ टप्प्यात भरण्याची मुभा महावितरणकडून देण्यात आली आहे. असे अलिबागचे सहाय्यक कार्यकारी अभियंता डी.बी चिपरीकर यांनी सांगितले.
हेही वाचा- रायगडमधील अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्याचे प्रशासनाचे आदेश