रायगड - कोरोनाचे संकट अजून टळले नसताना मंदिरे खुली करून संकटाला आमंत्रण देण्याची वेळ येऊ शकते. मात्र, राज्यातील भाजपा नेते हे मंदिरे खुली करण्याचा पवित्रा घेत राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे योग्य नाही, अशी टीका खासदार सुनील तटकरे यांनी भाजपावर केली आहे. आगामी काळात जिल्ह्यात सकारात्मक भूमिका घेऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले जाणार असल्याचेही तटकरे यांनी म्हटले आहे.
अलिबाग शहर आणि तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीला खासदार सुनील तटकरे हे उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधताना भाजपाचे सुरू असलेले राजकारण, आगामी निवडणुकांबाबत धोरण, आमदार जयंत पाटील यांच्या मैत्रीबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हा काही प्रमाणात कमी होत चालला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संयमाने हळूहळू टाळेबंदी शिथिल करीत असून व्यवहार सुरू झाले आहेत. अशावेळी भाजपाकडून राजकारण केले जात आहे. मंदिरे उघडण्याच्या दृष्टीने भाजपातर्फे आंदोलने केली जात आहेत. मात्र, कोरोना महामारी ही अद्याप नष्ट झालेली नाही. असे असताना मंदिरे उघडून संकटाला आमंत्रण देण्याबाबत भाजपा आग्रही आहे. अशा संकट काळात भाजपाने राजकारण न करता संयमी भूमिका घेणे गरजेचे आहे, अशी टीका खासदार सुनील तटकरे यांनी केली आहे.
जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांच्यामार्फत बैठका सुरू आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकार असून समनव्यक भूमिकेतून आगामी निवडणुकीत पक्ष सामोरे जाणार आहे असेही सुनील तटकरे यांनी सांगितले. अलिबागमध्ये पक्ष हा कमी पडत असला तरी कार्यकर्त्यांना पक्षाकडून उभारी देण्याचा प्रयत्न पक्षाकडून केला जाणार आहे. आढावा बैठकीनंतर अलिबागमधील पत्रकारांचा कोरोनयोद्धा म्हणून खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
जीवनात ही घडी अशीच राहू दे -
शेकाप आमदार जयंत पाटील हे महाविकास आघाडीसोबत आहेत का आणि आपली मैत्री अद्याप आहे का या प्रश्नावर तटकरे यांनी, शेकाप हा महाविकास आघाडीसोबत आहे. आमदार जयंत पाटील यांच्या मैत्रीबाबत 'जीवनात ही घडी अशीच राहू दे' अशी प्रतिक्रिया यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी दिली.